राज्यात सध्या मुलांना शाळेत मारहाणीचे अनेक प्रसंग समोर आलेले आहेत. या सर्वाला केवळ शिक्षण संस्था, शिक्षण खाते व सरकारला जबाबदार धरण्यात येते. पण शाळेतील प्रश्न शाळांतूनच सुटण्यासाठी पालक शिक्षक संघटना बळकट असणे व पालकांनीही काहीवेळा प्रश्न करून शाळेत चुकणाऱ्या गोष्टी दुरुस्त करावयास सांगणे गरजेचे आहे.
राज्यातील मुलांना शाळांतून मारहाण होत असल्याने त्यासंदर्भातील गोष्टी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे दिसून येते. मुलांना शाळेत घालताना पालकांकडून घरानजीकची शाळा हा निकष निवडला जातो. आईवडिलांनंतर शाळा व शिक्षक याच मुलाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनतात. त्यामुळे मुलांसाठी शाळा निवडतानाच काही गोष्टींची खातरजमा केल्यास पुढील अनेक समस्या येत नाहीत. अनेक पालकांकडून मुलांना खासगी गाड्यांतून शाळेत पाठवले जाते, त्यामुळे त्या गाडीतील मुलांच्या सुरक्षिततेकडे पालकांचे दुर्लक्ष होते. मुलांना शाळेत नेण्या-आणण्यासाठी पालक गेल्यास शाळेतील उपक्रम, दिवसभरातील घडामोडी मुले येताना पालकांना सांगतात व त्यातून मुलांना शाळेत उद्भवलेल्या अनेक अडचणी सुटू शकतात.
वर्गात मुलांना बसण्यासाठी योग्य जागा आहे का? मुलांच्या वर्गात आवश्यक प्रकाशयोजना व इतर सुविधा आहेत का? साधारणत: २६ मुलांमागे एक शिक्षक अशी संकल्पना मानली जाते त्यानुसार वर्गांची रचना आहे का? याची खातरजमा पालकांनी करण्याची गरज आहे व नसल्यास पालक - शिक्षक संघटनेने शाळा व्यवस्थापनकडे याबाबत चर्चा करावी. मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे? लहान मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत का? त्या ठिकाणी स्वच्छता आहे का? या गोष्टीही पालकांनी पाहाव्यात. यानंतर शिक्षिका निदान बीएड असाव्यात तरच त्यांना कसे शिकवावे ते समजेल, नाहीतर अनेक शाळा व्यवस्थापने खर्चाकडे लक्ष देत कंत्राटावर कमी शिक्षण अर्हतेवाल्यांची नेमणूक करतात. केवळ प्रगतीपुस्तकावर खूश न होता मुलांसाठी इतर कोणत्या अॅक्टिव्हिटी होतात, हे पाहणेही पालकांचे काम आहे.
शाळेत मुलांच्या मित्र-मैत्रिणी कसे वागतात व डब्यातून काय आणतात, याचीही मुलाकडे विचारपूस केल्यास आपले मूल कोणत्या वातावरणात वाढतेय याची जाणीव पालकांना होईल. शाळा व्यवस्थापन पालकांच्या फी व सरकारी अनुदानावर चालतात, त्यामुळे पालकांची नजर केवळ मुलावर नाही तर इतर गोष्टींवरही हवी. तरच पुढील अनेक प्रश्न सुटतील व मारहाणीचे प्रकार न होता शिक्षकही मुलांच्या प्रगतीकडे स्वत:हून लक्ष देतील.
अजय लाड,
(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ आहेत.)