सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
म्हापसा : येथील पालिकेने पालिका कर्मचारी असलेल्या १० बुथस्तरीय अधिकारी (ब्लॉक लेवल अधिकारी) तथा बीएलओंचे वेतन कापले आहे. ऑगस्ट महिन्यात या कर्मचाऱ्यांनी कायदेशीररीत्या बीएलओची सेवा बजावली होती. सदर सेवेतील दिवसांचा पगार मासिक वेतनातून कापला आहे.
सरकारच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत म्हापसा नगरपालिकेतील ५ अधिकारी व ५ पर्यवेक्षक अशा दहा कर्मचाऱ्यांची बुथ स्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नेमणुकीचे पत्र संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून पालिकेला सादर करण्यात आले आहे. त्यानुसार १० पैकी अधिकारी असलेले ५ जण दर शुक्रवारी, तर पर्यवेक्षक असलेले ५ जण दर शुक्रवारी व शनिवारी बीएलएओची सेवा मामलेदार कार्यालयात बजावतात. यातील ८ जण म्हापसा मतदारसंघात, एक पर्वरी, तर एक डिचोली मतदारसंघात बीएलओ म्हणून कार्यरत आहे.
या बीएलओंचे हजेरीपट देखील मामलेदार कार्यालयाकडून पालिकेला सादर करण्यात आलेले आहे. मात्र केवळ त्या कर्मचाऱ्यांचाच हजेरीपट नव्हे, तर संपूर्ण हजेरीपट (रजिस्टर) सादर करण्यात यावे, अशी सूचना पालिकेच्या लेखा तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मामलेदारांना केली आहे. याबाबतचे विनंती पत्र पालिकेकडून मामलेदार कार्यालयांनी पाठवलेले नाही.
तरीही वरील कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून बीएलओंच्या सेवा दिवसांचा पगार कापण्यात आला आहे. या अन्यायामुळे बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मामलेदार असलेल्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा व आम्हाला हक्काचा पूर्ण मासिक पगार मिळवून द्यावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे.
माघारी न बोलावताच पगार कापला...
विद्यमान पालिका मंडळाची स्थापना झाल्यापासून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. त्यानुसार बीएलओ ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलविण्याचा विचार पालिका मंडळाने चालवला होता. मात्र अद्याप याबाबतचा निर्णय पालिकेने सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना कळविला नाही. तरीही बीएलओंचा पगार पालिकेकडून कापण्यात आला आहे.