डॉ. जगदीश काकोडकर : अभियानाला गरजूंकडून उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (गोमेकॉ) कॅन्सर स्क्रिनिंग अभियानाअंतर्गत सुरू केलेल्या मोफत चाचणीत आतापर्यंत पाच विभागांत काही जणांना कॅन्सरची लागण झाल्याचे, तर अनेकजण कॅन्सर होण्याआधीच्या टप्प्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅन्सरच्या जवळ पोहोचलेले काहीजण पुढील उपचारांसाठी इस्पितळांत पोहोचत नसल्याची माहिती गोमेकॉच्या कम्युनिटी विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
विविध प्रकारचा कॅन्सर झालेल्या किंवा कॅन्सर होण्याजवळ आलेल्यांची माहिती मिळून, त्यांच्यावर त्वरित उपचार व्हावे आणि त्यांचे जीव वाचावे, या हेतूनेच गोमेकॉने विविध भागांमध्ये जाऊन मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सर स्क्रिनिंग अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत मंडूर, वाळपई, कुडचडे, साखळी आणि काणकोण या पाच भागांतील १,०५५ जणांची गोमेकॉतील डॉक्टरांनी मोफत चाचणी केली. त्यांतील तिघांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले, तर ४२ जण कॅन्सरच्या जवळ पोहोचल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय अनेक संशयितांचे नमुने गोमेकॉने चाचणीसाठी घेतले आहेत. जे रुग्ण कॅन्सरच्या जवळ पोहोचले आहेत तसेच ज्यांचे नमूने चाचणीसाठी घेतलेले आहेत, अशांवर तत्काळ उपचार सुरू व्हावे, यासाठी त्यांना इस्पितळांत जाण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. परंतु, त्यांतील अनेकजण पुढील उपचारांसाठी इस्पितळांत जाणे टाळत असल्याचे दिसून येत आहे, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
आरोग्य खाते लवकरच घेणार आढावा !
पुढील काहीच दिवसांत आरोग्य खात्यामार्फत आतापर्यंत झालेल्या चाचणी शिबिरांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यात किती संशयित किंवा उपचारांसाठी इस्पितळांत गेलेले नाहीत, याचा आकडा समोर येईल. त्यानुसार तत्काळ उपचार घेण्यात ते का टाळाटाळ करत आहेत, याचाही शोध घेतला जाणार असल्याचे डॉ. जगदीश काकोडकर यांनी नमूद केले.
२६ ऑक्टोबरला कुडतरीत शिबिर
गोमेकॉच्या मोफत कॅन्सर स्क्रिनिंग अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुढील शिबिर २६ ऑक्टोबरला कुडतरीत होणार आहे. प्रत्येक महिन्याला दोन विभागांत जाऊन शिबिर घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन संशयित ठरल्यास तत्काळ उपचार घ्यावे, असे आवाहनही डॉ. काकोडकर यांनी केले.