गोव्यातील वन्यजीव सप्ताह

आज वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे झपाट्याने लोकवस्तीसाठी जंगले नष्ट करून, वन्यजीवांना त्याच्या नैसर्गिक अधिवासातून निराधार करून आम्ही खरेतर वन्यजीव आणि मानव यांच्या संघर्षाला गतिमान करत आहोत.

Story: विचारचक्र |
02nd October, 12:06 am
गोव्यातील वन्यजीव सप्ताह

पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीत वसलेली गोव्याची भूमी वन्यजीवांसाठी पूर्वापार ख्यात आहे, याची प्रचिती या भूमीच्या अंतरंगात प्रवेश केल्यावर येते. एकेकाळी गोव्यातील पश्चिम घाट जैविक संपत्तीची श्रीम‌ंती अनुभवत होता. इथल्या जंगलात ढाण्या वाघांचे वास्तव्य होते आणि त्यासाठी गोव्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात व्याग्रेश्वर किंवा वाघ्रो देव म्हणून त्याची वेळोवेळी पूजा केली जाते. वाघदेवाच्या पाषाणी मूर्ती जंगलात वसलेल्या गावात पुजनीय ठरलेल्या पहायला मिळतात. पेडणेत पालये गावाची सीमा हरमलशी भिडते, तेथे पूर्वी जंगलात वास्तव्यास असलेला ढाण्या वाघ गोड्या पाण्याच्या तलावात‌ील पाणी प्यायला यायचा आणि त्यामुळे हा तलाव वाघकोळंब म्हणून नावारूपास आला होता. वाघ हा इथल्या लोक‌मानसाला केवळ त्याच्या अचाट ताकदीमुळे आणि शौर्यामुळे मोहित करत नव्हता, तर त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाची छाप त्यांच्यावर पडली होती आणि त्यामुळे तो लोकदेवाच्या रूपात पुजला जात आहे. पोर्तुगीजांच्या गुलामगिरीखाली बरीच वर्षे गोवा खितपत पडला तरी देखील इथल्या लोकांनी लोकसंचितांचे आत्मियतेने जतन केले, त्याची प्रचिती जंगलात वसलेल्या गावात येते.

गोव्यातील सह्याद्रीचा बहुतांश भूभाग खरेतर आज चार अभयारण्ये आणि एका राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून संरक्षित झाला होता. परंतु अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांच्या निर्मितीनंतर त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय झालेले नसल्याने, या संरक्षित वन क्षेत्रात स्थानिकांचा हस्तक्षेप आणि अतिक्रम‌णे वाढत चालली आहेत. काजू आणि अन्य बागायती पिकांच्या विस्तारात जंगलांची आबाळ सुरू आहे. त्यांची गुरे ढोरे चरण्यासाठी संरक्षित वनक्षेत्रात जात असल्याने बऱ्याचदा ती वाघासारख्या प्राण्याच्या भक्ष्यस्थानी पडतात आणि त्याचे पर्यवसान गोळावलीसारख्या जंगलात चार वाघांना विष घालून ठार मारण्याबरोबर त्यासंदर्भातले सारे पुरावे नष्ट करण्यात होऊ लागलेले आहे, ही चिंतेची बाब आहे. वाघ आणि माणूस यांच्यातले संबंध आज दुरावत गेलेले आहेत आणि त्यामुळे धनगरांसारखा पशुपाल विष घालून वाघांना ठार मारण्याचे अघोरी कृत्य करण्यास धजावत आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ द्वारे ज्या अभयारण्यांची आणि राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती झालेली आहे, तेथील जंगली श्वापदांचा नैसर्गिक अधिवासही त्यांच्यासाठी मानवी हस्तक्षेप आणि वाढत्या अतिक्रमणापायी संकटग्रस्त होऊ लागलेला आहे. एकेकाळी गणेश चतुर्थीसाठी माटोळी सजवण्यासाठी परिसरातील मौसमी फळे, फुले, पाने यांचा कल्पकते‌ने आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा नियोजनबध्द उपयोग येथील स्थानिक करायचे. आज जंगलातील माटोळी बाजारात पोहचलेली असून, माटोळीला लागणारे सर्व साहित्य ओरबाडून आणून विकण्याकडे आणि पैसे जास्तीत जास्त कसे क‌मावता येईल याकडे माणसाचा कल वाढू लागलेला आहे. आमच्या कृत्यांनी जैविक संपदेचे आगर मानला जाणारा पश्चिम घाट शेकडो संक‌टांनी त्रस्त झालेला आहे. विकासाच्या नवनव्या प्रकल्पांमुळे होणारी जंगल‌तोड अभयारण्य-उद्यान यांच्या मुळावर येऊ लागलेली आहे. 

गोव्याला १०५ कि.मी.चा सागर किनारा असून, आमची मत्स्य लालसा एकेकाळी मर्यादित होती. परंतु आज माशांना प्रचंड मागणी असल्याने ट्रॉलरद्वारे आम्ही त्यांचा वारेमाप उपसा करत आहोत. माश्यांबरोबर जाळ्यात सापडणारे समुद्री साप, कासव आणि अन्य जीवांचा बळी घेत‌ला जात आहे. मत्स्य जीवांचा होणारा वारेमाप उपसा, वाढते प्रदूषण यामुळे सागरातील संपदा कधीच संकटग्रस्त झालेली आहे. प्रवाळाचे अस्तित्व दिवसेंदिवस आम्ही दुर्बल करू लागलो आहोत. गोव्यातील नदीनाले आणि त्यांच्याशी निगडित खाड्या यांचे नैसर्गिक चक्र विस्कळीत होऊ लागले आहे. ओलिव्ह रिडलीसारखा कासव केरी, गालजीबाग, मोरजी, आगोंद इथल्या सागर किनाऱ्यावरची शान आज आम्ही निर्माण केलेल्या असंख्य संकटांनी ग्रस्त झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर साजरा केला जाणारा वन्यजीव सप्ताह वन खात्यासह आम्हाला जंगल, जैविक संपदा, पर्यावरणीय परिसंस्था यांच्या रक्षणासाठी प्रेरित करण्यास कारणीभूत ठरो.

यंदाच्या वन्यजीव सप्ताहाची संकल्पना सह अस्तित्वातून वन्यजीवांचे संवर्धन अशी असून, स्थानिक जनतेत जी वन्य‌जीव संरक्षण आणि संवर्धनासंद‌र्भात पूर्वापार जाणीव होती, ती सुदृढ करण्यासाठी पर्यावरण जागृ‌तीचे अभियान व्यापक प्रमाणावर राबवण्याची गरज आहे. एकेकाळी समाजाने आपण ज्या परिसरात राहतो तेथील पर्यावरणीय परिसंस्थेत वावरणाऱ्या वन्यजीवांना परके न मानता, अन्न साखळीत त्यांच्या स्थानाला आपल्या धर्म जीवनात महत्त्व दिले होते. देवाच्या नावाने ज्या जंगलांना देवरायांचा दर्जा दिला होता, तेथील केवळ वन्यजीवच नव्हे तर दगड घोंडे, झरे यांचे पावित्र्य टिकेल याची काळजी घेतली होती. आज वन खात्याने आदिवासी, जंगल निवासी जाती जमातींना विश्वासात घेऊन वाघ्रो, वाघदेव म्हणून पट्टेरी वाघाला पुज्यस्थानी मानून त्याच्या जंगलातील संरक्षणाला प्राधान्य का दिले होते? यामागे पूर्वजांची भावना काय होती? याचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज आहे.

महात्मा गांधीजींच्या जन्मदिवसापासून सुरू होणारा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागे एकूण मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी वन, पर्यावरण आणि वन्यजीव यांचे अस्तित्व कसे पूरक आहे हे अधोरेखित करण्याचा हेतू होता. आज वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे झपाट्याने लोकवस्तीसाठी जंगले नष्ट करून, वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून निराधार करून आम्ही खरेतर वन्यजीव आणि मानव यांच्या संघर्षाला गतिमान करत आहोत. आज हवामान बदलामुळे निसर्ग आणि पर्यावरणाची साखळी विस्कळीत झालेली आहे, त्याबाबत आम्ही गांभीर्याने विचारविनिमय करून एकंदर त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाची भागिदारी वन्यजीव ही संक‌ल्पना या वर्षीच्या वन्यजीव सप्ताहात केंद्रस्थानी आहे. त्यांना आमचे जीवन समृद्ध करण्यासाठी, निर्धास्तपणे जगू देणे गरजेचे आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५