कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी, मेहुणा, इतरांविरुद्ध एफआयआर
बंगळुरू : म्हैसूर लोकायुक्तांनी कर्नाटकातील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) जमीन घोटाळ्याप्रकरणी मंगळवार, दि. १ ऑक्टोबरपासून चौकशी सुरू केली. २७ सप्टेंबर रोजी लोकायुक्तांनी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी, मेहुणा आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
ईडीने ३० सप्टेंबर रोजी सर्वांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ‘मुडा’ने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला म्हैसूर शहरातील प्राइम लोकेशनमधील १४ जागा बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप आहे.
दुसरीकडे, सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएन पार्वती यांनी १४ वादग्रस्त भूखंड ‘मुडा’ला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्वती यांनी ‘मुडा’ आयुक्तांना पत्र लिहिले की, कसाबा होबळीच्या केसरे गावात माझ्या ३ एकर आणि १६ गुंठे जमिनीऐवजी, मला म्हैसूरमधील विजयनगरातील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात १४ पर्यायी भूखंड देण्यात आले. मला विक्री करार रद्द करून १४ साइट परत करायच्या आहेत.
जमीन परत करण्याच्या पत्नीच्या निर्णयावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटरवर लिहिले की, माझी पत्नी पार्वती यांनी म्हैसूरमधील ‘मुडा’ला जमीन परत केली आहे. राजकीय द्वेष निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करून माझ्या कुटुंबाला वादात ओढले, हे राज्यातील जनतेलाही माहीत आहे.