मुंबई : चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार येत्या ८ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत हिंदी, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि बंगालीसह तब्बल ३७० चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९७६ मध्ये आलेल्या 'मृगया' चित्रपटातून त्यांनी करकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९८२ मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाने मिथुन सुपरस्टार झाले.