समोरून जात असलेल्या इतर वाहनांना धडक, अपघातात चारही वाहनांचा चक्काचूर
छत्रपती संभाजीनगर: सध्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रमुख महामार्गांवर अपघातांच्या घटना दिवसागणिक घडत आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एक विचित्र अपघात झाल्याची माहितीसमोर येतेय. भरधाव वेगात असलेली ४ वाहने एकमेकांवर आदळली असून यातील दोन ट्रक थेट दुकानात घुसले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचावकार्य सुरु असून ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरसंभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल येथे आज शनिवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहने पुण्याहून संभाजीनगरच्या दिशेने जात होती.
यातील एका वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच वाहनाने समोरून जात असलेल्या इतर वाहनांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की चारही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील दोन ट्रक थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या दुकानात शिरले. सुदैवाने दुकानात कुणीही नसल्याने मोठी जीविहातहानी टळली. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.