७ जण हॉस्पिसिओत, १२ गोमेकॉत दाखल : डॉ. बेतोडकरांची माहिती
मडगाव : कुटबण व मोबोर जेटीवर सुमारे १७२ रुग्ण आढळून आलेले आहेत. यातील ३३ जणावर उपचार सुरु असून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ७ व गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात १२ रुग्ण उपचार घेत आहेत. कॉलराची साथ सुरु झाल्यानंतर अचानक ३० ते ३५ रुग्ण एकावेळी आढळून येऊ लागले. त्यामुळे उपचार देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्या. स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येत असून दिवसांतून ६ वेळा साफसफाई केली जात आहे.
याशिवाय रुग्णांना स्वच्छ वातावरणात ठेवले जात आहे. आरोग्य खात्याकडून कॉलरा रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या रुग्ण संख्या कमी होत असताना दिसत आहे. पण एखाद्या ट्रॉलर्सवर रुग्ण असल्यास रुग्णसंख्या अचानक वाढूही शकते. त्यामुळे सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हणू शकत नाही, असेही डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.
कुटबण व मोबोर या जेटी परिसरात सध्या १७२ कॉलराचे रुग्ण आहेत. ७ जण हॉस्पिसिओत तर १२ जण गोमेकॉत उपचार घेत आहेत. दरम्यान समुद्रात असलेल्या ट्रॉलर्सवर काही रुग्ण आढळून येऊ शकतात. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हणू शकत नाही. मात्र सर्व काळजी घेतली जात आहे, असे मत डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर डॉ. बेतोडकर यांनी सांगितले की, कॉलराची साथ नेमकी कुठून सुरु झाली याची नेमकी माहिती नाही. पण परिसरात व वैयक्तिक स्वच्छता न राखल्यास उलट्या व जुलाब सुरु होते. कॉलरा झाल्यावर वेळेत उपचाराचीही आवश्यकता असते. आतापर्यंत मृत्यू झालेल्या कामगारांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बोटीवरील कामगारांना ओआरएससह इतरही औषधे पुरवली जात आहेत. यामुळे शरीरातील पाणी व्यवस्थित राहण्यास मदत होऊ शकते व उपचारासाठी त्यांना पुन्हा किनारी आणले जाऊ शकते. बाळ्ळी आरोग्य केंद्राकडून योग्य त्या सूचना, जनजागृती व काळजी घेतली जात आहे.