पणजी : विदेशात आकर्षक पगाराची नोकरी किंवा सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लोकांना लुबाडण्याचा गोरखधंदा राज्यासह संपूर्ण देशात सुरू आहे. लोक बऱ्याचदा ठकसेनांच्या दाव्यांची कोणतीही शाहनिशा न करता, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघत नोकरीच्या आमिषाला भुलून आपली जमापूंजी त्यांच्या हवाली करतात. आर्ले-राय येथील आशीष वाघ यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग ताजा असतानाच, आगशी पोलिसांनी अशाच एका प्रकरणाचा शिताफीने छडा लावला आहे. (AGACIAM YOUTH LURED INTO JOB SCAM)
समोर आलेल्या फिर्यादीनुसार, जॉनी अँथनी डिकॉस्टा उर्फ जाझ (मूळ कारवार) याने एका तरुणीसह अॅलेन अँटोनिओ सिल्वेरा (२५,आगशी) याच्याशी ओळख वाढवली.आपल्या गोव्यातील अनेक सरकारी कार्यालयांत ओळखी असून तेथे नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच याबाबत आपल्या मित्रपरिवाराला देखील माहिती देण्यास सांगून त्यांच्याकडूनही पैसे उकळले. अशाप्रकारे नोकऱ्यांचे आमिष दाखवत अनेकांकडून सुमारे ३१ लाख रुपये लाटले. सदर प्रकार १ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला. दरम्यान आपली व आपल्या ओळखीच्या इतरांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अॅलेन अँटोनिओ सिल्वेरा (२५,आगशी) याने आगशी पोलीस स्थानकात रीतसर तक्रार नोंदवली.
दरम्यान तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आगशी पोलीसांनी त्वरित अॅक्शन मोडमध्ये येत तपास सुरू केला. अनेक महीने विविध योजना आखून प्रगत इलेक्ट्रोनिक माध्यमांद्वारे संशयित जॉनी अँथनी डिकॉस्टा उर्फ जाझ (मूळ कारवार) याचा माग काढण्यात आला. काल दुपारी १२:४५ वाजता त्यास शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी योग्य कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.आता जाझसह असलेल्या तरुणीचा शोध सुरू असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.