गणेशोत्सवादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या

मडगाव पोलिसांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September 2024, 12:27 am
गणेशोत्सवादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या

मडगाव : मडगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीवेळी मडगाव पोलिसांकडून गणेशोत्सव काळात भाविकांच्या आरोग्याची, सुरक्षिततेबाबत उपाययोजना करावी. नागरिकांना त्रास होईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मडगाव पोलिस मुख्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मडगाव परिसरातील एकूण सुमारे १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना मडगाव पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांच्यासह मडगाव पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक, मायना कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई, कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस, कोलवा पोलीस निरीक्षक तारी आदींनी मार्गदर्शन केले.

उत्सव काळात सरकारकडून जारी नियमांचे पालन करण्यात यावे. रस्त्याशेजारी मंडप उभारणी केलेल्या मंडळांनी जास्तीत जास्त स्वयंसेवकांची नियुक्ती करावी व वाहतुकीला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही बसवणे व आवश्यक ती सुरक्षिततेबाबत उपाययोजना करावी, आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवणे, याशिवाय वीज खात्याकडून व अग्निशामक दलाकडून आवश्यक ना हरकत दाखला घेण्याची सूचना मडगाव पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींना केली आहे.

मडगावातील मंडळांना उत्सव काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही, वाहतूक नियम पाळले जातील. मंडपाच्याठिकाणी लावण्यात येणार्‍या स्पिकरचा आवाज शासनाच्या नियमानुसार असावा, कोणत्याही विषयावरुन धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

तसेच उत्सव काळात काही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी मंडळ जबाबदार राहणार असल्याने आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यास सांगण्यात आलेले आहे. उत्सव काळात पोलिसांकडून रात्रीची गस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन
आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मडगाव व परिसरातील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जात असल्यास घरातील मौल्यवान वस्तू आपल्यासोबत घेउन जाव्यात. पोलिसांकडून गस्त वाढवण्यात येणार असली तरीही काळजी घेण्याची गरज आहे. बाहेरगावी जात असल्यास त्याची कल्पना नजीकच्या पोलीस ठाण्यालाही द्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.