जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : स्वच्छतेसह शुध्द पाण्याच्या पुरवठ्यावर चर्चा
मडगाव : कुटबण जेटीवरील कामगारांची तब्येत बिघडली असून या ठिकाणी डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सोमवारी कुटबण जेटीवर संयुक्त पाहणी करण्याचे ठरवले आहे. याशिवाय कामगारांची योग्य नोंद ठेवणे, त्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे तसेच परिसरातील स्वच्छता व स्वच्छतागृहांच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बोटमालकांनी कामगारांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची सोय करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात कुटबण जेटीसंदर्भात उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार क्रुझ सिल्वा, सरपंच डिक्सन वाझ, गोवा कॅनचे संयोजक रोलंड मार्टिन्स यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर उपजिल्हाधिकारी बर्वे यांनी, कुटबण जेटीवरील साथरोगाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी त्याठिकाणी स्वच्छता राखणे व जनजागृती करणे याशिवाय पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी संयुक्त पाहणी करण्यात येईल, असे सांगितले. मच्छीमार खात्याकडे बोटी व त्यावरील कामगारांची माहिती असते, ती माहिती पंचायत व इतर खात्यांकडे सुपूर्द करावी व कामगारांच्या स्वच्छतेसंदर्भात आवश्यक सुविधा बोटमालकांनी पुरवाव्यात,असेही सांगितले.
केळशी सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले की, ही आरोग्य समस्या असल्याने एकमेकांकडे बोट दाखवून हा प्रश्न सुटणार नाही. बोट मालकांनी कामगारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याची गरज आहे. जेवणाची जागा स्वच्छ असणे, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची उपलब्धता, साफसफाई गरजेची आहे. पंचायतीसह मत्स्य विभाग, आरोग्य विभाग, कामगार खाते, जिल्हाधिकारी कार्यालय या सर्वांनी एकत्र येत हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. अस्वच्छ पाण्याच्या वापरातून कामगारांच्या आरोग्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे कोणत्या टँकरमधून पाणी पुरवठा होत होता याची चौकशी होण्याची गरज आहे. मलेरिया, डेंग्यू यांच्यासह आता कॉलराची साथही येणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे बोटमालकांनी कामगारांची नोंद करण्याची गरज आहे, असेही सांगितले.
कुटबण जेटीवरील अनेक कामगारांना आरोग्य समस्या निर्माण झालेली आहे. ५० स्वच्छतागृहांचा विषय अजूनही बाकी आहे. जेटीवरील स्टॉल्सची, बोटीवरील जेवण करण्याची स्थितीवर तपासणी होण्याची गरज आहे. ५० पेक्षा जास्त कामगारांची तब्बेत बिघडल्याचे समजते. काहीजण खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. कुटबण जेटीचे अजूनही उद्घाटन झालेले नाही. अनेक बोटी कामाशिवाय उभ्या आहेत. पैसे देऊन कामगार स्वच्छतागृह वापरणार नाहीत ते उघड्यावरच जातील. त्यावर उपाययोजना काढण्याची गरज आहे. शुध्द पाण्याचा वापर पिण्यासाठी होण्याची गरज आहे. या सर्व समस्या मासेमारी बंद असताना होण्याची गरज. मत्स्य खात्याच्या संचालकांनी किंवा मंत्र्यांनी घटनास्थळी येत पाहणी करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार क्रुझ सिल्वा यांनी केले.
गोवा कॅनचे संयोजक रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले की, कुटबण जेटीवरील आरोग्य समस्यांवर गेली आठ वर्षे केवळ बैठका घेऊन पाहणीच केली जात आहे. कोणत्याही खात्याकडून याची जबाबदारी घेण्यात आलेली नाही. कुटबण जेटीला अजून जेटी म्हणून मान्यता मिळालेली नाही. याआधीच्या बैठकींची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची गरज आहे, तरच उपाययोजना करता येऊ शकतात. संयुक्त व्यवस्थापन समितीची नियुक्ती करण्याची गरज आहे. जेटीवरील तीन बोटमालक सोसायटी आहेत. त्यांना या उपाययोजनांवेळी विश्वासात घ्यावे. साथरोग हाच केवळ विषय नाही तर इतरही अनेक विषय आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र बाळ्ळी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत व कुटबण जेटी हा भाग हाताळू शकत नाही. त्यासाठी विशेष यंत्रणा असण्याची आवश्यकता आहे. मच्छीमार हा व्यवसाय असून त्याच्या कामगारांची नोंदही कामगार खात्याकडे असावी, अशी मागणी मार्टिन्स यांनी केली.