बार्देश : विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकांचे निलंबन करून नियमांनुसार करणार कारवाई

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th September 2024, 03:57 pm
बार्देश : विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकांचे निलंबन करून नियमांनुसार करणार कारवाई

पणजी :कामुर्ली येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीत सुरु असलेल्या श्री सरस्वती विद्यामंदिर या खासगी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याला अमानुष पद्धतीने मारहाण करणाऱ्या शिक्षिकांचे प्रथम निलंबन करून नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई होणार आहे. (Camurlim School Incident) भारतीय न्याय संहितेतील योग्य कलमांनुसार पोलीस तपास करून कारवाई करतील. तर शिक्षण खाते निलंबनाची कारवाई करून चौकशी सुरू करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकाची पाने फाडल्याच्या कारणावरून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दोघा शिक्षिकांनी बेदम मारहाण केली. या विषयीची तक्रार कोलवाळ पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा आहे. अन्य कुणाचा राग शिक्षिकेने विद्यार्थ्यावर काढला असावा असे दिसून येते. असे प्रकार प्रकार वाढत आहेत. हल्लीच्या काळात विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारहाण करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. शिक्षकांनाही आता समूपदेशन देण्याची गरज निर्माण झाली आहे, शिक्षण सचिवांकडे याबाबत मी चर्चा केलेली आहे. विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार का घडतात? याचाही अभ्यास व्हायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.