नवी दिल्ली : देशात मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यातच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आंध्र प्रदेशात १५ आणि तेलंगणात 9 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्याशी चर्चा केली आहे. पाऊस आणि पुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने दोन्ही राज्यांकडून सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
दरम्यान, आंध्रच्या विजयवाडा आणि गुंटूर शहरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. विजयवाडा-गुंटूर राष्ट्रीय महामार्ग आणि विजयवाडा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालाही पुराचा फटका बसला आहे. १७ हजार लोक १०० हून अधिक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. बुडामेरू नदीला उधाण आले आहे.१.१ लाख हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
आंध्र प्रदेशात झालेल्या भीषण पावसामुळे आतापर्यंत १० जणांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, पूर आणि पावसामुळे तेलंगणात २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सूर्यपेट, भद्राद्री कोठागुडेम, महबूबाबाद आणि खम्मम जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. खम्मममधील ११० गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. हैदराबादमध्ये आज सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
त्याच प्रमाणे उत्तर पश्चिम भारतातही पावसाने कहर केला आहे. राजस्थानमध्ये मान्सूनने ऑगस्टमध्ये नवा विक्रम केला असून, या महिन्यात ३४४ मिमी पाऊस झाला,ही आकडेवारी २०११ ते २०२३ पर्यंतची सर्वाधिक आहे. या वर्षी आतापर्यंत कोणत्याही महिन्यात एवढा पाऊस पडला नाही. यापूर्वी २०१६मध्ये ऑगस्टमध्ये २७७.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर १८,००० लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
याशिवाय १२०० जणांना वाचवण्यात यश आले आहे. वडोदरा आणि कच्छमध्ये पुरामुळे परिस्थिती बिकट आहे. घरांच्या छतावर मगरींचे दर्शन झाले आहे. अहवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटीननुसार अजून किमान पांच दिवस गुजरात, दक्षिण पश्चिम राजस्थान व उत्तर महाराष्ट्रात पावसाचे सावट कायम राहण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात उद्भवलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने सोमवारी (२ सप्टेंबर) उत्तर प्रदेश-महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातसह ६ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी ओडिशामध्ये जोरदार पाऊस झाला. गंजम जिल्ह्यातील तोटा साही गावात पावसामुळे घर कोसळून एका ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.