चीन ९१ पदकांसह दुसऱ्या स्थानी : भारत सहा पदकासह ७१ व्या स्थानी
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेची सांगता रविवारी (११ ऑगस्ट) झाली. या स्पर्धेत १० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. ३२ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात एकूण ३२९ पदके देण्यात आली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेर शेवटची स्पर्धा रविवारी झाल्यानंतर पदक तालिकेतील सर्व क्रमांकांवर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये अमेरिकेने चीनला मागे टाकत सलग चौथ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांत शेवटी महिलांची बास्केटबॉलची अंतिम फेरी पार पडली. अटीतटीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेने फ्रान्सला ६७-६६ अशा फरकाने पराभूत केले. यामुळे अमेरिकेच्या महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटी अमेरिकेचीही ४० सुवर्णपदके झाली. चीननेही ४० सुवर्णपदके जिंकली आहेत. मात्र अमेरिकेने चीनपेक्षा अधिक रौप्य पदक जिंकल्याने त्यांनी अव्वल स्थान पटकावले.
जर अमेरिकेचा महिला बास्केटबॉल संघ अंतिम सामना पराभूत झाला असता, तर सर्वाधिक सुवर्णपदक जिंकल्याने चीनने अव्वल स्थान पटकावले असते. मात्र अमेरिकेच्या महिला बास्केटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकत अमेरिकेचे अव्वल स्थान निश्चित केले.
अमेरिकेने ४० सुवर्णपदकांसह ४४ रौप्य आणि ४२ कांस्य असे एकूण १२६ पदके जिंकले आहेत. त्यापाठोपाठ असलेल्या चीनने ४० सुवर्णपदकांसह २७ रौप्य आणि २४ कांस्य पदके अशी मिळून ९१ पदके जिंकले आहेत.
पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असेलेल्या जपानने २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य पदके जिंकली, तर चौथ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाने १८ सुवर्ण, १९ रौप्य आणि १६ कांस्य पदके जिंकली. यजमान फ्रान्सने पाचवा क्रमांक मिळवला. त्यांनी १६ सुवर्ण, २६ रौप्य आणि २२ कांस्य पदके जिंकली.
भारताचा संघ या यादीत १ रौप्य आणि ५ कांस्य पदकासह ७१ व्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे एका अर्शद नदीमने जिंकेलेल्या एका सुवर्णपदकामुळे पाकिस्तानने पदक तालिकेत भारताला मागे टाकत ६२ वा क्रमांक मिळवला.बॉक्स
एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकणारे खेळाडू
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जलतरणपटू लिओन मार्चंडने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ४ सुवर्णपदके जिंकली आहेत. २२ वर्षीय लिओन मार्चंडची तुलना महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सशी केली जाते. मार्चंडने अवघ्या २ तासांच्या कालावधीत २ सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये ३-३ सुवर्णपदके जिंकली आहेत. यात यूएसएची टोरी हस्के, सिमोन बिल्स आणि गॅबी थॉमस, ऑस्ट्रेलियाची मॉली ओ'कॅलाघन यांचा समावेश आहे.
०.००५ च्या फरकाने जिंकले सुवर्ण
पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून नोहा लायल्स हा जगातील सर्वात वेगवान पुरुष बनला. श्वास रोखून धरणाऱ्या या १० सेकंदांमध्ये जगातील अव्वल खेळाडूंमध्ये अशी स्पर्धा रंगली होती की, हा फरक एका सेकंदाच्या छोट्या पॉईंटवर ओळखता आला नाही. हा सामना अतिशय चुरशीचा आणि रोमांचक झाला. अमेरिकन धावपटू लायल्सने ९.७८४ सेकंदांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळेसह शर्यत पूर्ण केली, परंतु असे करणारा तो एकमेव धावपटू नव्हता. जमैकाचा धावपटू किशन थॉम्पसन यानेही त्याच वेळेत शर्यत पूर्ण केली, या दोन धावपटूंमध्ये फक्त ०.००५ सेकंदांचा फरक होता, ज्यामुळे हा सामना ऑलिम्पिक इतिहासातील सर्वांत रोमांचकारी ठरला. तर अमेरिकेचा धावपटू फ्रेड कर्लीने ९.८१ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.
सौंदर्यामुळे जलतरणपटूला सोडावे लागले ऑलिम्पिक
पॅराग्वेची तरुण महिला जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला तिच्या सौंदर्यामुळे मायदेशी पाठवण्यात आले. तिचे सौंदर्य तिच्याच संघातील खेळाडूंचे लक्ष विचलित करत होते. पॅरिस ऑलिम्पिकमधून तिच्या देशाने परत बोलावल्यानंतर तिने ऑलिम्पिक व्हिलेजचे विशेषाधिकार गमावले कारण ती वरवर पाहता कार्यक्रमांदरम्यान तिच्या स्वतःच्या संघातील खेळाडूंचे लक्ष विचलित करत होती. आपल्या सौंदर्यामुळे अलोन्सोने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेकांची मने जिंकली होती. विशेषत: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंसाठी जे त्यांना खूप महागात पडले. कारण तिचे सोबती तिचे सौंदर्य पाहून विचलित होत होते. पॅराग्वेला परतल्यानंतर अलोन्सोने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
लैंगिगतेच्या विषयावरून इमान खलिफ चर्चेत
लैंगिगतेच्या वादामुळे चर्चेत आलेल्या अल्जेरियाच्या बॉक्सर इमान खलिफने शुक्रवारी वेल्टरवेटमध्ये सुवर्णपदक पटकावले. इमान खलिफने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले की, मी एक महिला म्हणून जन्माला आले आणि महिलेसारखे लहानाची मोठी झाले. शुक्रवारी तिने चीनच्या यांग लियूला तीन राउंडच्या लढतीत ५-० अशा फरकाने हरवले. इमान खलिफवरून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेंडरचा वाद सुरू झाला होता. सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने या वादावरही प्रतिक्रिया दिली. खलिफ म्हणाली की, मी इतर कोणत्याही महिलांसारखीच महिला आहे. मी एक महिला म्हणून जन्माला आले आणि महिलेसारखे आयुष्य जगले. पण माझ्या यशाचे काही शत्रू आहेत. त्यांना माझे यश पचत नाही.
युसूफ डिकेकचा अनोखा ‘स्वॅग’
१० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकरातील सामन्यात कोणत्याही उपकरणांची मदत न घेता, केवळ एक साधा चष्मा लावून खिशात हात घालून नेम साधणाऱ्या युसूफ डिकेच यांच्या शैलीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. एकाही उपकरणाची मदत न घेता लक्ष्य साधत रौप्य पदक पटकावले. त्यांचा स्पर्धेदरम्यानचा वावरही फार सहज होता. युसूफ यांनी गोंगाटामुळे लक्ष विचलीत होऊ नये म्हणून केवळ एक लहानसा इअरप्लग कानात लावला होता.
प्रायव्हेट पार्टमुळे गमावले पदक
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पोल वॉल्ट प्रकारात भाग घेण्याऱ्या फ्रान्सच्या ॲथलीट अँथनीने घेतलेली उडी प्रायव्हेट पार्टमुळे फसली आणि क्रॉस बार पडला. अँथनी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी ५.७० मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. सर्वकाही व्यवस्थितपणे पार पडत असताना शेवटच्या क्षणाला क्रॉस बारला प्रायव्हेट पार्ट लागला आणि पदरी निराशा पडली. त्यामुळे अँथनीला यादीत १२व्या स्थानावर राहावे लागले. मात्र असे असले तरी अँथनीला २ कोटी रुपयांची ऑफर मिळाली. ज्या कारणासाठी पदक हुकले, तेच कारण ऑफरसाठी पुढे आले आहे. ६० मिनिटांच्या वेब कॅम शोसाठी ही ऑफर देण्यात आली आहे.
सात महिन्यांच्या गर्भवती महिला तलवारबाजी स्पर्धेत
इजिप्तची नादा हाफिझ ही सात महिन्यांच्या गर्भवती महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली.
पहिली फेरी जिंकत तिने ऑलिम्पिक दावेदारी कायम ठेवली. जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीला नादा हाफिझने १५-१३ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर तिचा सामना दक्षिण कोरियाच्या जीऑन हायोंगविरूद्ध झाला. ज्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताची निराशाजनक कामगिरी
भारताला या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकता आले नाही. भारताची यावेळची कामगिरी टोक्यो ऑलिम्पिकपेक्षा खराब राहिली आहे. भारताच्या पदरात या ऑलम्पिकमध्ये एकूण सहा पदके पडली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदके आहेत. सुवर्ण पदकाच्या अभावासोबत भारत पदक तालिकेमध्ये देशांच्या यादीत ७१ व्या स्थानी आहे. भारतीय खेळाडूंनी २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी भारताच्या वाट्याला एकूण सात पदके आली होती. यात सुवर्ण पदकाचा देखील समावेश होता.
मनू भाकरला दोन कांस्य
२२ वर्षीय मनू भाकरने शुटिंगमध्ये भारताला दोन पदके मिळवून दिली. तर निरज चोप्राने भालाफेकध्ये रौप्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक मिळवले. लक्ष सेन आणि अर्जून बाबुटा हे कांस्य पदक जिंकण्याच्या फार जवळ होते, पण त्यांना अपयश आले. भारताच्या हॉकी संघाने कमाल केली. हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पकदकावर आपले नाव कोरले. १९७२ नंतर अशी पहिलीच वेळ होती. अमन सेहरावत याने कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकत भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू असण्याचा मान मिळवला.
भारताला मिळालेली पदके
मनू भाकर- कांस्य ( वूमन एअर १० मी. पिस्टल)
मनू भाकर आणि सरबजित सिंग - कांस्य( एअर १० मी पिस्टल टीम)
स्वप्नील कुसाळे - कांस्य (मेन्स ५० मी रायफल ३ पोझिशन)
हॉकी टीम- कांस्य (मेन्स हॉकी फिल्ड टीम)
अमन सेहरावत- कांस्य ( कुस्ती ५७ किलो वजनी गट)
निरज चोप्रा- रौप्य ( भाला फेक)
विनेश फोगाट प्रकरणाच्या निकालाची प्रतिक्षा लांबली
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रप्रकरणी रविवारी ११ ऑगस्टला निकाल येणे अपेक्षित होते. या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून होते. मात्र अपात्रतेप्रकरणी रविवारी निकाल लागला नाही. त्यामुळे भारतीयांची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. विनेशला अंतिम सामन्यापूर्वी वाढीव वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे विनेशने क्रीडा लवादात धाव घेतली होती. आता त्यानंतर तब्बल दुसऱ्यांदा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे भारतीयांना आणखी काही तास रौप्य पदकाबाबतच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.