म्हापसा डिटेंशन केंद्रातून ३ बांगलादेशी नागरिकांचे पलायन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th August 2024, 03:42 pm
म्हापसा डिटेंशन केंद्रातून ३ बांगलादेशी नागरिकांचे पलायन

म्हापसा : येथील स्थानबध्दता केंद्रातून तीन बांगलादेशी  नागरिक पसार झाले. केंद्राच्या छताचे सिमेंट पत्रे काढत संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन या तिन्ही संशयितांनी पळ काढला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मोहम्मद नयन हवालदेर (१९),  मोहम्मद हिलाल (३५), व मोहम्मद तोहेत मरिदा (२५) अशी या संशयितांची नावे नावे आहेत. 

 समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी ११  रोजी पहाटे ५ च्या सुमारास उघडकीस आली. स्थानबध्दता  केंद्रातील कर्मचार्‍यांना वरील तिन्ही बांगलादेशी नागरिक त्यांच्या खोलीत नसल्याचे आढळून आले. कर्मचार्‍यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता खोलीचे छत उघडे दिसले. लगेच त्यांनी ही माहिती अधिकार्‍यांना दिली. या केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. पण ते सापडू शकले नाहीत.  

त्यानंतर म्हापसा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदेश वेळीप यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी विदेशी कायदा कलम १४ अंतर्गत संशयितांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या तिन्ही संशयितांनी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान डिटेंशन सेंटरमधून पलायनची योजना मार्गी लावल्याचा अंदाज केंद्राच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या २४ डिसेंबर २०२३ पासून हे तिघेही बांगलादेशी नागरिक स्थानबध्दता केंद्रात होते. पेडणे पोलिसांनी एका चोरी प्रकरणात वरील तिघांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिघांना दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. कोलवाळ कारागृहात शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्यांना म्हापसा नजरबंदी केंद्रात दाखल केले होते. संबंधितांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना अद्याप डिपोर्ट केले नव्हते. याविषयी गृहखात्याने बांगलादेश प्रशासनाकडे संपर्क साधला होता. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणताही पत्रव्यवहार आलेला नाही. 

तिन्ही स्थानबध्द केलेले कैदी केंद्रातून पसार झाल्यानंतर पुन्हा या केंद्राच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता पर्यंत या केंद्रातून एकूण ५ विदेशी नागरिकांनी पलायन केले आहे. यापुर्वी ३१  जानेवारी २०२० रोजी अमीनू कानू महम्मेद हा  नायजेरीयन नागरीक पसार झाला होता. २ मार्च २०२३ रोजी डिमीट्री आलेक्झांड्रोव्ह हा रशियन नागरीकाने पलायन केले होते. केंद्राच्या खोलीच्या लोखंडी जाळीचे कुलूप तोडून आणि कौलारू छताची लोखंडी रीप कापून हा संशयित पसार झाला होता.

हेही वाचा