सरन्यायाधीशांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालू, अशी धमकीही आंदोलकांनी दिली होती.
ढाका: बांगलादेश अजूनही अराजकतेत धुमसत आहे. शनिवारी शेकडो बांगलादेशी निदर्शकांनी बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. विद्यार्थी आंदोलनाच्या समन्वयकांपैकी एक असलेल्या हसनत मोहोम्मद यांनी, सर न्यायाधीश आणि अपील विभागाच्या न्यायमूर्तींच्या राजीनाम्याची मागणी करणारा अल्टिमेटम जारी केला. यासोबतच सरन्यायाधीशांनी व इतरांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालू, अशी धमकीही आंदोलकांनी दिली होती.
आंदोलनादरम्यान, बांगलादेशच्या सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बैठक पुढे ढकलली. या बैठकीत देशाच्या न्यायव्यवस्थेवर चर्चा होणे अपेक्षित होते. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर ओबेदुल हसन संध्याकाळी राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. मात्र आंदोलनाची धग सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा देण्यातच धन्यता मानली.
हे सर्व सुरू असतांना बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सध्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे लष्कराने घेतली असली तरी बांगलादेशातील अंतर्गत भागांत अजूनही हिंसा आणि जाळपोळ सुरुच असल्याच्या बातम्या येत आहेत.
ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षीच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे विश्वासू मानले जाते. ७६ वर्षीय शेख हसीना यांनी सोमवारी भारतात आश्रय घेतला. शेख हसीना सरकारवर व्यापक मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.