पुनरुत्पादनासाठी अळंबी गरजेची !

जगातील प्रत्येक सजीव हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी व आपली पिढी पुढे नेण्यासाठी धडपडत असतो. मग बुरशी तरी या गोष्टीला कशी अपवाद ठरेल?

Story: साद निसर्गाची |
04th August, 03:35 am
पुनरुत्पादनासाठी अळंबी गरजेची !

वर्षाऋतू हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने, पावसाळा सुरू झाला की समुद्रातील मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली जाते. यामुळे मासे खवय्यांना शाकाहारी पर्याय शोधावे लागतात. पश्चिम घाटाच्या माळेत ओवलेल्या गोव्यातील लोकांना मात्र निसर्गाने हा पर्याय खाद्य अळंबीच्या रुपाने आधीच उपलब्ध करून ठेवलेला आहे. 

अळंबी ही पावसाळ्यात उगवणारी एक प्रकारची बुरशी आहे. ही बुरशी पश्चिम घाटातील घनदाट जंगलात सापडते. अळंबी जास्तकरून वारुळावर उगवते. जोरदार पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा ऊन येते तेव्हा अळंब्यांची उपज होते. माळरानावर उगवणारे फुगे, वारुळावर उगवणारी अळंबी, शीत अळंबी, पाव अळंबी, काळ्या सोंडेची सोनयाळी अळंबी यासारखे अळंबीचे कितीतरी प्रकार आपल्याला पश्चिम घाटात पहायला मिळतात. यातील काही खाद्य अळंबी असतात तर काही अळंबी विषारीही असू शकतात. नैसर्गिकरित्या उत्पादित होणारी अळंबी चविष्ट व स्वादिष्ट असल्याने यांना शहरात मोठी मागणी असते. मोठा पाऊस झाला की, अळंबी जमिनीतून वर उगवतात. ती शोधून काढण्याचे काम बरेच कसबीचे असते. माहितगार पहाटे लवकर जंगलात जाऊन अळंबी शोधून काढतात. 

पावसाळ्याच्या दिवसात गोव्यात मासेमारी बंदी असल्यामुळे या दिवसांत खवय्ये खाद्य अळंब्यांवर ताव मारणे पसंत करतात. या दिवसात खाद्य अळंब्यांना मोठ्याप्रमाणात मागणी असल्यामुळे अळंबी तोडणारे अळंबीचे एकदम छोटे कळे देखील उपटून काढतात. यामुळे त्या भागातील अळंबी नामशेष होण्याचा धोका संभवतो.

जगातील प्रत्येक सजीव हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी व आपली पिढी पुढे नेण्यासाठी धडपडत असतो. मग बुरशी तरी या गोष्टीला कशी अपवाद ठरेल? अळंबीची कळी फुलल्यानंतर एखाद्या छोट्या छत्रीसारखी दिसते. फुलून झाल्यानंतर ही बुरशी हवेत बीजाणू सोडून अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून आपली पिढी वाढवण्याचे काम करत असते. या अळंब्यांवर कितीतरी प्रकारच्या आळ्या, मुंग्या, किटक आपल्या अन्नासाठी अवलंबून असतात. पावसाळ्यात अळंब्यांना जास्त मागणी असल्याने माणूस स्वार्थापोटी ती मुळातून उपटतो. अळंबी नामशेष झाल्यास अन्नसाखळीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपण काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. वारुळावरची सगळी अळंबी तोडू नये. काही अळंबी पुनरुत्पादनासाठी ठेवावी. उद्याचा नैसर्गिक समतोल राखून ठेवण्यासाठी आपण आज संवर्धनाची पावले उचलणे गरजेचे आहे.


स्त्रिग्धरा नाईक