श्रावण मासी

श्रावण मास हा व्रतांचा मास म्हणून सुप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर श्रावण हा मनाला आल्हाद, प्रसन्नता प्रदान करणारा महिना आहे आणि विशेष म्हणजे, स्त्रियांसाठी खास असा हा महिना. जणू काही या महिन्यातील उत्सव सणांची रचना ही स्त्रियांच्या शरीर व मनाचा विचार करून केली गेली असावी.

Story: श्रावण |
03rd August 2024, 02:19 am
श्रावण मासी

श्रावण मास हा व्रतांचा मास म्हणून सुप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर श्रावण हा मनाला आल्हाद, प्रसन्नता प्रदान करणारा महिना आहे आणि विशेष म्हणजे, स्त्रियांसाठी खास असा हा महिना. जणू काही या महिन्यातील उत्सव सणांची रचना ही स्त्रियांच्या शरीर व मनाचा विचार करून केली गेली असावी. श्रावणी सोमवार - भगवान शंकराची उपासना, श्रावणी शुक्रवार - लक्ष्मी नारायणाची आराधना, श्रावणी रविवार - आदित्य नारायणाची उपासना आदि. अनेक उपासनादिक व्रते या महिन्यात आचरली जातात. 

आदित्यपूजन

गोव्यात महिलांकडून केले जाणारे विशेष व्रत म्हणजे आदित्यपूजन. श्रावणातील रविवारी केल्या जाणाऱ्या या व्रताला कोंकणीत 'आयतार पूजा' असे म्हटले जाते. आयतार  पूजा म्हणजे सूर्याची पूजा. सूर्यदेवतेची उपासना हिंदू धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. श्रावण महिन्याला जरी धार्मिकतेची झालर असली, तरी खऱ्या अर्थाने ती निसर्गाची पूजा आणि आरोग्याची जोपासना आहे. या व्रतात सूर्याचीच पूजा का? तर सकाळचे कोवळे ऊन आरोग्यकारक आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. आयुर्वेद शास्त्रात सुद्धा म्हटले आहे, 

आरोग्यं भास्करादिच्छेत्|

तेजस्वी अश्या सूर्याकडून उत्तम आरोग्य प्राप्त करावं. आरोग्याला आवश्यक असे सूर्यकिरण भारतात सर्वांनाच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणून खरं तर सूर्यकिरणांच्या अभावामुळे होणारे रोग सहसा भारतात आढळू येत नाहीत. प्रत्यक्षात मात्र सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारे व्हिटॅमिन डी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे असे दिसते. त्या अनुषंगाने होणारे विविध आजार समाजात दिसत आहेत. त्यावर उपाय म्हणून कृत्रिम  व्हिटॅमिन डी आपल्याला घ्यावं लागत आहे. सूर्यकिरणांचे पुष्कळ फायदे आपल्या पूर्वजांना माहीत होते, म्हणून त्याचा पुरेपूर व योग्य वापर ते करत असत. पहाटे सूर्यनमस्कार, सूर्याला अर्ध्य देणे, कडधान्यांना ऊन दाखविणे, कपडे निर्जंतुक करण्यासाठी उन्हात घालणे, नवजात बालकाला तेल लावून कोवळ्या उन्हात धरणे इ. अनेक आरोग्यदायक लाभ सूर्यकिरणांमुळे होत असल्याने, त्या सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच जणू या आयतार पूजनाची प्रथा सुरू झाली असावी यात शंका नाही. 

आज मात्र आपण अनारोग्यकारक जीवनशैली आत्मसात केली आहे. सतत बंद खोल्यांमध्ये, पि.ओ.पि इंटेरियर करून, एसीमध्ये राहू लागल्यामुळे सूर्यकिरणांना आपले शरीर एक्सपोज होत नाही व त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आत्ता काहींना हे व्रत करणे आवडत नाही किंवा शक्य होत नाही अश्या महिलांनी किमान या व्रताच्या निमित्ताने सूर्यदेवाप्रति कृतज्ञता व्यक्त करून कोवळ्या सूर्यप्रकाशात किमान २० मिनिटे वेळ घालवावा व आयतार पूजनात वापरण्यात येणाऱ्या पत्रींचे (वनस्पतींचे) आरोग्यदायी फायदे समजून घ्यावे. 

नागपंचमी

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. भारत हा कृषिप्रधान देश. आणि उंदरांपासून पिकांचे रक्षण करणारा कृषिमित्र सर्प. या सर्पांप्रति कृतज्ञता जपण्यासाठी नाग पूजन केले जाते. निसर्गातील जीव जंतुंमध्ये सुद्धा ईश्वरी अंश बघणारी आपली उदात्त हिंदू संस्कृती आहे.  लाह्या हा या उत्सवातील विशेष नैवेद्य. गोव्यात साळीच्या लाह्या या नैवेद्यात वापरल्या जातात. भात (सालासकट तांदूळ) भट्टीत भाजून फुलवतात व साळीच्या लाह्या बनवल्या जातात. या पावसाळ्यात व त्यापुढे येणाऱ्या शरद ऋतूत सेवन करण्यास योग्य आहेत. लाह्यांना संस्कृत भाषेत 'लाजा' असे म्हटले जाते. साळीच्या लाह्या या सुपाच्य म्हणजेच पचायला हलक्या आहेत. 

लाह्यांचे आरोग्यासाठी पुढील फायदे आहेत

१) आयुर्वेदाचार्यांनी असे म्हटले आहे की - लाजा: छर्दिषु!

उलटी थांबवण्यासाठी जी द्रव्ये आहेत त्यामध्ये लाह्या या सर्वात उत्तम आहेत. विशेषत: गरोदरपणात मळमळ, उलटी होत असेल तर सकाळी उपाशी पोटी मूठभर लाह्या चावून खाल्ल्यास त्रास कमी होतो. 

२) लाह्या रूक्ष असल्यामुळे शरीरात वाढलेले मेद, कफ यांचे शोषण करतात म्हणूनच स्थूलपणा व प्रमेह यामध्ये उपयुक्त आहेत. 

३) लाह्या ग्राही शोषण करणाऱ्या असल्याने  जुलाब थांबविणाऱ्या आहेत. 

४) तसेच सद्य: तर्पण करणाऱ्या म्हणजेच तृप्ति करणाऱ्या आहेत, म्हणून खूप तहान लागत असेल, थकवा असेल तर लाह्या गूळ, खोबऱ्यासह खाव्या किंवा लाह्यांचे पेय (लाजा मंड) प्यावे.

५) पोटात, छातीत जळजळ, पित्ताची उलटी, डोके दुखी असे त्रास असताना लाह्या आहारात ठेवाव्यात. 

६) लाह्या शरीरात वाढलेले अतिरिक्त पित्त व कफ दोष कमी करणाऱ्या आहेत.

लाह्या या अगदी लहान बालकापासून ते अजी-आजोबांपर्यंत सर्वांसाठी सेवनीय आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की पंचखाद्य, खीर, लाडू या स्वरूपात लाह्या या पुष्टी प्रदान करणाऱ्या ठरतात,  पेया-मंड या स्वरूपात घेतल्या तर ताप कमी करणाऱ्या तसेच अग्निवर्धक व नुसत्या खाल्ल्या तर स्थौल्यहर म्हणजे जाडी कमी करण्याचे कार्य करतात.

साबूदाणा, बटाटा, मिल्क शेक, वेफर्स इ. सहसा उपवासाला खाल्ले जाणारे पदार्थ हे पचायला अतिशय जड असल्याने आरोग्यासाठी अहितकारक, रोग उत्पन्न करणारे ठरतात. हे सगळे सांगण्याचा उद्देश हा आहे की या आरोग्यदायी लाह्या नागपंचमी पुरत्या मर्यादित न ठेवता श्रावणातील उपवासासाठी लाह्यांचे पदार्थ बनवून सेवन करा. आरोग्यदायी व आनंदी श्रावणाच्या सर्वांना शुभेच्छा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य