सिंगापूरची प्रतिस्पर्धी जियान झेंगचा ४-२ ने पराभव
पॅरिस : भारताची युवा महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये इतिहास रचला. आपल्या वाढदिवसा दिवशीच तिने महिला एकेरीत टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. श्रीजाने सिंगापूरची प्रतिस्पर्धी जियान झेंग हिचा ९-११, १२-१०, ११-४, ११-५, १०-१२, १२-१० असा पराभव केला.
ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात असा कारनामा कुठल्याच महिला खेळाडूंना करता आला नव्हता. दरम्यान, मानिका बात्राने राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रितिका पावडेला पराभूत करत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला होता. आता श्रीजा अकुलाने जिआन जेंगला पराभूत केले. या दोन्ही महिला खेळाडूंची नावे भारतीय ऑलिंपिकच्या इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहेत.
श्रीजा अकुला आणि जिआन जेंग या दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांना पराभूत करण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र, शेवटी श्रीजा अकुलाने बाजी मारली आणि सिगांपूरच्या जिआन जेंगला ४-२ ने पाणी पाजले.
अकुलाचे शानदार पुनरागमन
या सामन्यातील सुरुवातीच्या सेटमध्ये जिआन जेंगने श्रीजा अकुलाला पराभूत केले. मात्र, श्रीजा खचून गेली नाही, तिने पुढील ३ सेट्समध्ये जिआन जेंगला पाणी पाजले आणि ३-१ ने आघाडी घेतली. जिआन जेंगला दिसत होते की, श्रीजाला बॅकहँड खेळताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र श्रीजाने फोरहँड अटॅक सुरू ठेवला. चौथ्या सेटमध्ये श्रीजाला पराभवाचा सामना करावा लागला. जिआन जेंगने ३-२ ने मुसंडी मारली होती. मात्र सहावा सेट जिंकत श्रीजाने इतिहास रचला.