बाणावलीत पारंपरिक मच्छीमारांनी प्रार्थना करत मासेमारी हंगामाची सुरुवात केली

बंदी उठल्यानंतर १ ऑगस्टनंतर हवामानाचा अंदाज घेत समुद्रात मासेमारी केली जाईल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
25th July, 03:07 pm
बाणावलीत पारंपरिक मच्छीमारांनी प्रार्थना करत मासेमारी हंगामाची सुरुवात केली

मडगाव : बाणावली किनार्‍यावर पारंपरिक मच्छीमारांकडून प्रार्थना केल्यानंतर बोट समुद्रात उतरवून रापण टाकून नव्या हंगामाची सुरुवात करण्यात आली. सध्या मासेमारी बंदी असल्याने १ ऑगस्ट रोजी बंदी उठल्यानंतर हवामानाचा अंदाज घेऊनच खोल समुद्रात मासेमारीसाठी बोटी उतरवण्यात  येतील, असे पारंपरिक मच्छीमारांनी स्पष्ट केले. 

 मान्सून कालावधीत समुद्रात जाण्यासाठी बोटींना बंदी करण्यात येते त्यामुळे मच्छीमार बांधव बंदीच्या पार्श्‍वभूमीवर व्यवसाय दोन महिने बंद ठेवतात. जूनपासून बंदी असलेली मासेमारीवरील निर्बंध ऑगस्ट महिन्यात उठवण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कुटबण जेटीसह दक्षिण गोव्यातील विविध किनार्‍यांवरील मच्छीमारांची लगबग दिसू लागलेली आहे. कुटबण जेटीवर काही बोटींवरील कामगार दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा जेटीवर थोड्या संख्येने दाखल झाले आहेत. मासेमारी बंदी जाहीर झाल्यानंतर बोटींवरील कामगार झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा अशा त्यांच्या मूळ गावी गेले होते. ते आता पुन्हा माघारी येण्यास सुरुवात झाली आहे. कुटबण येथे बोटीची डागडुजी करणे, कामगारांना आवश्यक साहित्य पुरवणे, जेवण बनवण्यासाठी भांडी, बोटीवरील जाळ्यांची देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग आलेला आहे. 

बाणावली समुद्रकिनार्‍यावरील पारंपरिक बोटमालकांकडून गुरुवारी सायंकाळी बोटींची पूजा करण्यात आली. यावेळी पाद्रींनी प्रार्थना करत या हंगामात मच्छीमारांना चांगली मासळी मिळावी, कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी प्रार्थना केली. बाणावली किनार्‍यावरील मच्छीमार पेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही राज्यात मोठा पाउस पडत असल्याने समुद्रही खवळलेलाच आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हंगामाला सुरुवात झाल्यानंतरही हवामानाचा अंदाज घेत पुढील आठवड्याभरात समुद्राचा अंदाज घेत बोटी उतरवण्यात येतील. मात्र, हवामान चांगले राहिल्यास ऑगस्टच्या मध्यापर्यंत सर्व बोटी समुद्रात दाखल होतील.

मासेमारीवर बंदी असल्याने दोन महिन्यांपासून अस्सल मत्स्य खवय्ये असलेल्या जनतेला वातानुकूलित गोदामांत साठवणूक केलेल्या मासळीवर दिवस काढावे लागले आहेत. मासेमारी हंगाम सुरु झाल्यावर मासळीची आवक वाढलेली असल्याने तसेच श्रावणही सुरु असल्याने माफक दरात ताजी मासळी मिळण्याची आशा खवय्ये व्यक्त करत आहेत.

हेही वाचा