म्हापसा, सडयेत झाडे कोसळून तिघेजण जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July 2024, 10:57 pm
म्हापसा, सडयेत झाडे कोसळून तिघेजण जखमी

म्हापसा : वादळी वारा व मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यात विविध ठिकाणी एकूण २४ पडझडीच्या घटना घडल्या. खोर्ली-सीम व सडये शिवोली येथे दोन घरांवर झाडे कोसळून दोन वृध्द महिलासह तिघेजण जखमी झाले.

म्हापशातील खोर्ली - सीम येथील साळगांवकर कुटुंबियांच्या घरावर झाड कोसळून संपूर्ण घराचे नुकसान झाले. घराची कौले फुटून अंगावर पडल्याने प्रभावती साळगावकर व रेषा साळगावकर या वृध्द महिला जखमी झाल्या असून उपचारार्थ जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

ही घटना दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. स्थानिक नगरसेविका कमल डिसोझा व पालिका अधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी केली. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून बाजूला केले. यात सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी साळगावकर कुटुंबियांनी हे झाड कापण्यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या झाडा शेजारी अजून दोन झाडे आणि एक माड अशी तीन झाडे कोसळण्याच्या मार्गावर असून ही तिन्ही धोकादायक झाडे पडल्यास साळगांवकर कुटुंबियांचे संपूर्ण घर कोसळण्याची शक्यता आहे.

दुसरी दुर्घटना सडये शिवोली येथे घडली. घरावर झाड कोसळल्याने महेश कळंगुटकर हे जखमी झाले. घटनेवेळी कळंगुटकर हे पलंगावर झोपले होते. त्याचवेळी झाड कोसळल्याने घराचा काँक्रीट खांब पडला व त्याखाली ते चिरडले गेले. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ५ लाखांचे नुकसान झाले.

तसेच मार्ना शिवोली येथील विकास फुलारी यांच्या घरावर माड कोसळला. तर बिठ्ठोण येथे यामीन खान यांमया घरावर, तर वेर्ला येथे एका घरावर झाड कोसळून नुकसान झाले.
दरम्यान, बार्देशमध्ये मार्ना शिवोली, नास्नोळा, गिरी, ओशेल, वेर्ला- काणका, पिर्णा, एकोशी, बिठ्ठोण, पुंडलिकनगर पर्वरी, व्हळवाडा पिळर्ण या ठिकाणी झाडे कोसळून वीज खांब व वाहिन्या तुटल्या. म्हापसा, पर्वरी व पिळर्ण अग्निशमन दलामया जवानांनी ही झाडे कापून बाजूला केली.