खेळाडूंना जाहीर केलेली बक्षीसे चतुर्थीपूर्वी वितरित करू!

क्रीडामंत्री; पॅरालंपिक संघटनेला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही केले स्पष्ट

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
24th July, 02:42 pm
खेळाडूंना जाहीर केलेली बक्षीसे चतुर्थीपूर्वी वितरित करू!

पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तसेच पॅरालंपिक स्पर्धेत पदके मिळवलेल्या गोमंतकीय खेळाडूंना जाहीर केलेली​ बक्षीसे येत्या गणेश चतुर्थीपूर्वी वितरित केली जातील. शिवाय पॅरालंपिक संघटनेलाही मान्यता दिली जाईल, अशी हमी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी सभागृहात दिली.

आमदार केदार नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. पॅरालंपिक संघटनेला क्रीडा प्राधिकरणाची मान्यता मिळाल्याशिवाय निधी देता येत नाही. संघटनेने २०११ मध्ये मान्यतेसाठी क्रीडा प्राधिकरणाकडे कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्यांच्याकडून आणखी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संघटनेला मान्यता देण्यात येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे, असे मंत्री गावडे म्हणाले.

पॅरिसमध्ये आयोजित पॅरालंपिक स्पर्धेला केवळ तीन ते चार महिने शिल्लक आहेत. याची तयारी राज्य सरकारने कशी सुरू केली आहे, त्यासाठी गोव्यातील स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे का, असे प्रश्न आमदार जीत आरोलकर यांनी उपस्थित केले. त्यावर बोलताना, पॅरालंपिक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड राष्ट्रीय पॅरालंपिक संघटना करीत असते. त्यात गोव्यातील जे खेळाडू सहभागी होतील, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. विशेष खेळाडूंसाठी स्पर्धेच्या तयारीसाठी आवश्यक त्या सर्व साधनसुविधा गोव्यात उपलब्ध असल्याचे दोनवेळा आयोजित पर्पल फेस्तमधून स्पष्ट झालेले आहे, असे मंत्री गावडे यांनी नमूद केले.

विशेष खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाल्यानंतर त्यांच्यासोबत काळजीवाहक पाठवण्याची गरज असल्याचे तसेच पदके मिळवलेल्या खेळाडूंना जाहीर केलेली बक्षीसे लवकरात लवकर देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. त्यावर, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या विशेष खेळाडूंसोबत काळजीवाहक पाठवण्यात येतो, असे ते म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तसेच पॅरालंपित स्पर्धेत पदके मिळवलेल्या खेळाडूंना जाहीर केलेली बक्षीसे येत्या गणेश चतुर्थीपूर्वी वितरित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा