बोमाको : पश्चिम आफ्रिकन देश माली येथील डेम्बो गावात सशस्त्र दहशतवादी गटांनी केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. माली २०१२ पासून, सुरक्षा, राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या भीषण संकटांचा सामना करत आहे. आतापर्यंत येथे जिहादी घुसखोरी आणि आंतर-सामुदायिक हिंसाचारामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
बुर्किना फासोच्या सीमेजवळील मालीच्या मध्य प्रदेशातील एका गावात सशस्त्र गटाने हल्ला केल्यानंतर किमान २६ लोक ठार झालेत. एका सरकारी अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, संघर्षग्रस्त प्रदेशामधला हा ताजा हिंसक हल्ला आहे. रविवारी संध्याकाळी डेंबो गावात त्यांच्या शेतजमिनीत काम करत असताना हल्लेखोरांनी गावकऱ्यांवर हल्ला केला, असे डेम्बो बँकास शहराचे महापौर मौले गुइंदो यांनी सांगितले. अशा प्रकारचे हल्ले मध्य मालीमध्ये वारंवार होत आहेत
रविवारच्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, परंतु अल्-कायदाशी संबंधित एक अतिरेकी गट जेएनआयएमवर संशयाची सुई वळली आहे. हा गट अनेकदा या प्रदेशातील गावकऱ्यांना अशाच प्रकारे लक्ष्य करतो, जुलैच्या पहिल्या आठवड्यात याच बंडखोरांनी लग्न समारंभावर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात किमान २१ लोकांचा मृत्यू झाला होता.
मध्य आणि उत्तर मालीमध्ये सशस्त्र हिंसाचार एका दशकाहून अधिक काळ सुरू आहे. नुकत्याच हद्दपार केलेल्या फ्रेंच सैन्याच्या मदतीने उत्तरेकडील शहरांमध्ये सत्तेतून बाहेर पडलेल्या अतिरेकी बंडखोरांनी पुन्हा संघटित होऊन दुर्गम गावे आणि सुरक्षा दलांवर हल्ले सुरू केले आहेत. उत्तरेत सक्रिय असलेल्या जातीय तुआरेग बंडखोरांसोबतचा २०१५ चा शांतता करार देखील कोलमडला आहे, यामुळे सुरक्षा संकट अधिक गडद झाले आहे.