साप्ताहिकी : खून, पडझड, अधिवेशन ठरले लक्षवेधी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st July 2024, 12:01 am
साप्ताहिकी : खून, पडझड, अधिवेशन ठरले लक्षवेधी

पणजी : गोव्यात या आठवड्यातही पावसाचा जोर कायम होता. आठवड्याची सुरुवात ओर्डा-कांदोळी येथे एका कॅनेडियन नागरिकाच्या खुनाने झाली. एसटी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभा तहकूब करण्यात आल्यामुळे दोन दिवस विधानसभेचा प्रश्न काळ वाया गेला. त्यामुळे दोन महत्त्वाच्या विषयाला बगल देण्यास सरकार यशस्वी ठरले. याशिवाय राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे पडली. झाडे पडून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्त झाली होती.


मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गेल्या आठवड्यातही राज्यभर मुसळधार पाऊस कायम राहिला. वादळी पावसामुळे काही भागांत घरे, झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे स्थानिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांवर तुंबून राहिलेले पाणी कायम आहे. त्याचा फटका वाहन चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. राजधानी पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेले खड्डे मुसळधार पावसामुळे पुन्हा उघडे पडले आहेत. त्याचा फटका पणजीवासीयांसह विविध कामांनिमित्त राज्यभरातून पणजीत येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. पावसामुळे तिळारी धरणासह राज्यातील सर्व धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. 


ओर्डा कांदोळी येथील खुनाचा छडा

ओर्डा - कांदोळी येथे आरनाल्डो जोजफ सुआरिस (६९) या ओसीआय नागरिकाची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली. मारेकरी घराची कौले काढून घरात शिरला आणि त्याने खून केला. नंतर घरासमोरील गॅरेजमधील सुआरिस यांची कार घेऊन तो हल्लेखोर पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांना सुआरिस याची कार आग्वाद सिकेरी हेलिपॅड परिसरात सापडली. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यातील एक दोन फुटेजमध्ये संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी अधिक चौकशी करून संशयित अरविंद राजू पवार उर्फ परशू (२०, रा. मूळ सातारा) याला जेरातगी-कर्नाटक येथून अटक करून खुनाचा छडा लावला.


एल्टन डिकॉस्टा यांच्यावरून विधानसभा सभागृहात गोंधळ

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी एसटी समाजाला लवकरात लवकर राजकीय आरक्षण मिळावे, असा विशेष ठराव सभागृह कामकाज समितीला पाठवला होता. तो सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावला होता. याच मुद्द्यावर बोट ठेवून काँग्रेस आमदाराने पत्रकार परिषद घेऊन सभापतींच्या भूमिकेवर टीका करत गंभीर आरोप केले होते. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केल्यानंतर सभापती तवडकर यांनी आमदार कामत यांच्या ‘एनईपी’संदर्भातील प्रश्नावर चर्चा सुरू करण्याची सूचना केली. त्याच दरम्यान, भाजप आमदार दाजी साळकर यांनी काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणत डिकॉस्टा यांनी एसटींच्या राजकीय आरक्षणावरून सभापतींवर केलेल्या आरोपांबाबत माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. या विषयावरुन सोमवारी पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराचा तास वाया गेला.

सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी

मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आरक्षणावरुन पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा या विषयाला हात घातला. आमदार एल्टन डिकॉस्टा माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज पुढे होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. यावरुन पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी झाली. त्यामुळे मंगळवारीही दोनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले होते. पण हा डाव त्यांच्याच अंगलट आल्याचे लक्षात येताच, केवळ सभापतीपदाचा मान राखला जावा यासाठीच आम्ही हा मुद्दा ताणून धरला होता. हा विषय आम्ही इथेच संपवत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. गदारोळामुळे सोमवार आणि मंगळवार दोन दिवस प्रश्नकाळ तहकूब करण्यात आले.

आरक्षणावरून दोन्ही दिवस वाया

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा भाग जमीनदोस्त करण्यात आला. त्यामुळे या विषयावरुन पोलीस महासंचालक डाॅ. जसपाल सिंग यांची बदली करण्यात आली होती. याशिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न चर्चेला येण्याची शक्यता होती. त्यामुळे मंगळवारी हा विषय चर्चेला आल्यास सरकार अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे आरक्षणावरून दोन्ही दिवस वाया गेले. त्यामुळे दोन दिवशी चर्चेला येणाऱ्या महत्त्वाच्या विषयाला बगल देण्यास सरकार यशस्वी ठरले.


पर्यटनमंत्र्यांना विरोधकांनी घेरले

पर्यटन खात्याने समुद्र किनारे स्वच्छता सुरक्षेसाठी नेमलेल्या दृष्टी कंपनीवर केलेल्या खर्चावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, तर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कंत्राटे दिली जात असलेल्या शॉन इव्हेंट कंपनीवरून आमदार विजय सरदेसाई यांनी बुधवारी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना घेरले होते. याशिवाय विधानसभेत गोवा माईल्स, टॅक्सी, अपघात, पावसामुळे झालेल्यामुळे नागरिकांची नुकसान, भंगारअड्ड्यांवर कारवाई, अस्मिता दिवस, नावशीतील मरिनाचा प्रश्न व इतर विषयावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

इतर महत्त्वाच्या घटना

-- कुडतरी ग्रामसभेत देवनागरी कोकणी भाषेला मिळणारा दर्जा रोमी कोकणी लिपीलाही मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्वानुमते रोमी कोकणी लिपीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, असा ठराव घेण्यात आला.

-- कांदोळी येथील आरनाल्डो जोजफ सुआरिस (६९) यांच्या खून प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अरविंद राजू पवार उर्फ परशू (२०, रा. मूळ सातारा) याला अटक करून खुनाचा छडा लावला.

--विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या हमीनुसार, दक्षता खात्याने शुक्रवारी दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक प्रदीप नाईक यांना निलंबित केले.

-- गुन्हा शाखेच्या सायबर विभागाने कळंगुट येथील एका हाॅटेलात बनावट कॉल सेंटर सुरू करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

--राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी निवृत्त आयएएस अधिकारी दौलत हवालदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी या प्रस्तावाला मान्यता दिली.

-- सिकेरी-कांदोळी येथे समुद्रात माटुंगा-मुंबई येथील प्रकाश दोशी (७३) आणि हर्षिता दोशी (६९) हे दाम्पत्य वाहून गेले. त्यांचा बुडून मृत्यू झाला. कल्पना पारेख (६८) यांना किनाऱ्यावरील नागरिकांनी वाचविले.

-- कामावर असताना दारू, ड्रग्जचे सेवन करणाऱ्या आणि जुगार खेळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार करून ती पोलीस अधीक्षकांना देण्याचे निर्देश पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.

-- आसगाव येथील आगरवाडेकर राहत असलेल्या घराचा भाग पाडल्यानंतर पोलीस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांची गोव्यातून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेच्या अॅग्म्यू कॅडरचे १९९६ बॅचचे अधिकारी अलोक कुमार यांनी सोमवारी ताबा घेतला.

--विधानसभा अधिवेशनासाठी बुधवारी सकाळी काणकोणहून पर्वरीला येत असताना सभापती रमेश तवडकर य‍ांची कार झुआरी पुलावर स्टेअरिंग लॉक होऊन कठड्याला धडकली.

-- एएनसीने चोपडे बस थांब्याजवळ छापा टाकून ईउर्ली विटाली कोरीतीन (४१) या रशियन नागरिकास अटक केली. त्याच्याकडून १.०३ कोटी रुपयांचा २ किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त केला.

-- आसगाव प्रकरणी संशयित पूजा शर्मा हिला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. 

हेही वाचा