भारतीय महिलांची द. आफ्रिकेवर मात; तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा १-१ने समारोप

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
09th July, 09:44 pm
भारतीय महिलांची द. आफ्रिकेवर मात; तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा १-१ने समारोप

चेन्नई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने १० गडी राखून विजय मिळवला. यासह ३ सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी जिंकला.

तिसऱ्या टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला केवळ ८५ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य स्मृती मानधानाने नाबाद ५४ तर शेफाली वर्माने नाबाद २७ धावा करत एकही गडी न गमावता लक्ष्य १०.५ षटकांत गाठले.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाहुण्या संघाला अवघ्या ८४ धावांत गुंडाळले. पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी घातक गोलंदाजी करत ७ विकेट घेतल्या. 

भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम खेळ दाखवला. प्रथम गोलंदाजी करताना संपूर्ण संघ १७.१ षटकांत केवळ ८४ धावांत गारद झाला. पूजा वस्त्राकर आणि राधा यादव या जोडीने अर्ध्याहून अधिक प्रोटीज संघाला संपवले. पूजाने ३.१ षटकांत केवळ १३ धावा देत ४ बळी घेतले. राधाने ३ षटकांच्या गोलंदाजीत केवळ ६ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोसळली

ताजमिन ब्रिट्स, मारिजन कॅप आणि अनेके बॉश यांच्याशिवाय एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. ब्रिट्सने सर्वाधिक २० धावा केल्या तर बॉशने १७ धावांची खेळी केली. मारिजनने १० धावांची उपयुक्त खेळी खेळली. संघाचे हे तीन फलंदाज सोडले तर उर्वरित ८ नावे दुहेरी आकडाही गाठू शकली नाहीत.