कारवारच्या मराठी रंगभूमीवरील अनमोल रत्न काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ नाट्यकलाकार जयश्री माजाळकर यांचे निधन : १९६० ते १९९०च्या काळात केली रंगभूमीची सेवा

Story: बम्मू फोंडे । गोवन वार्ता |
05th July, 05:38 pm
कारवारच्या मराठी रंगभूमीवरील अनमोल रत्न काळाच्या पडद्याआड

कारवार : रंगभूमीवर पुरुषच स्त्रीची भूमिका साकारायच्या काळात स्त्री भूमिका करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्या आणि नंतर ‘कारवारच्या मराठी रंगभूमीवरील हिरा’ अशी ओळख निर्माण केलेल्या माजाळी येथील ज्येष्ठ नाट्यकलाकार जयश्री माजाळकर (७५) यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले. कारवारच्या रंगमंचावरील त्या अखेरच्या मराठी कलाकार म्हणाव्या लागतील.


कारवार हा एकेकाळचा मराठी, कोंकणी भाषिक प्रदेश. कारवारात मराठी शाळा बंद करून कन्नड शाळा उदयाला येऊ लागल्या, तेव्हापासून मराठीचे अस्तित्त्व कमी होऊ लागले. आज कारवारात मराठी टिकून आहे ती फक्त पुणे, मुंबईत कामानिमित्त राहणाऱ्या कारवारकरांमुळे. तसेच काही मोजके अजूनही मराठीप्रेमी कारवारात आहेत. ते मराठी आपली मातृभाषा मानतात. अशा या मराठीच्या संघर्षमय काळात जयश्री माजाळकर या स्त्री नाट्यकलाकाराने मराठी रंगभूमीची सेवा केली.

कन्नड भाषेच्या सक्तीमुळे कारवारात मराठीचे अस्तित्त्व कमी होऊ लागले आणि नंतरच्या काळात ही मराठी स्त्री कलाकार दुर्लक्षित राहिली, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. त्यांच्या निधनानंतर मराठीप्रेमी आणि रंगभूमीवरील ​जुन्याजाणत्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

अवघ्या १३व्या वर्षी रंगभूमीवर

जयश्री माजाळकर यांनी वयाच्या १३व्या वर्षी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. १९६० ते १९९०च्या काळात त्यांनी कारवारच्या अस्नोटी, माजाळी, सदाशिवगड, हणकोण, मुडगेरी या गोव्याच्या सीमेवरील गावात तसेच जिल्ह्याच्या विविध प्रदेशात, गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीतही आपली कला सादर केली. विविध नाटकांत काम करताना अनेक भूमिका करून रसिकांचे मनोरंजन केले. त्यांच्या कलांगुणांची दखल घेऊन विविध संघटना, संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. 

हेही वाचा