डीजीपींच्या बदलीच्या चर्चेत मुख्यमंत्री दिल्लीला!

अमित शहा, नड्डांची घेणार भेट; गोमंतकीयांचे लक्ष सिंग यांच्यावरील कारवाईकडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd July, 05:11 pm
डीजीपींच्या बदलीच्या चर्चेत मुख्यमंत्री दिल्लीला!

पणजी : आसगाव प्रकरणात अडकलेल्या पोलीस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांच्या बदलीच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी अचानक दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे राहते घर मोडणे आणि पिता-पुत्राचे अपहरण करण्याच्या प्रकरणात हणजुणचे निलंबित पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या अहवालात डीजीपी जसपाल सिंग यांच्यावर ठपका ठेवला आहे. 

आगरवाडेकर यांचे घर जसपाल सिंग यांच्या सांगण्यावरूनच पाडण्यात आले. त्याबाबत त्यांनी आपल्याला धमकीही दिली होती, असा दावाही प्रशल नाईक देसाई यांनी केला आहे.  या प्रकरणाने आतापर्यंत अनेक वळणे घेतलेली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण गांभीर्याने घेत, या प्रकरणात दोषी आढळणार्‍या सर्वांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आतापर्यंत प्रशल नाईक देसाई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, सात जण कोठडीत आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा अहवाल गृहमंत्रालयास पाठवून जसपाल सिंग यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले होते. असे असतानाच मुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना झाल्याने आणि तेथे ते अमित शहा आणि नड्डा यांची भेट घेणार असल्याने जसपाल सिंग यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.