स्मार्ट बसमध्ये क्षेत्र सहाय्यक देणार ई-तिकीट काढण्याचे प्रशिक्षण

‘कदंब परिवहन’ तीन महिन्यांसाठी ४५ कंत्राटी क्षेत्र सहाय्यकांना नेमणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 11:06 pm
स्मार्ट बसमध्ये क्षेत्र सहाय्यक देणार ई-तिकीट काढण्याचे प्रशिक्षण

पणजी : स्मार्ट बसमधून प्रवास करताना ई-तिकीट कसे काढावे हे प्रवाशांना शिकवण्यासाठी कदंब परिवहन महामंडळामार्फत बसमध्ये क्षेत्र सहाय्यकांच्या नियुक्तीसाठीची अधिसूचना काढण्यात आली आहे. या बसमध्ये भविष्यात कंडक्टर नसतील त्यामुळे प्रवाशांना बसचे तिकीट कसे काढायचे याचे प्रशिक्षण ‘क्षेत्र सहाय्यक’ देणार असल्याचे कदंब परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नाटो यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कदंब परिवहन महामंडळ तीन महिन्यांसाठी ४५ क्षेत्र सहाय्यक कंत्राटी पद्धतीने भरणार असून या पदांच्या तपशीलवार माहिती आणि अर्जासाठी कदंब कॉर्पोरेशन आणि शासकीय संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ ​​जुलै असल्याचे सांगण्यात आले आहे.

कदंब महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही अधिसूचना जारी केली असून या पदांबद्दल माहिती देताना संचालक नाटो म्हणाले, ‘ई-तिकीट कसे काढावे हे लोकांना शिकवण्यासाठी आम्ही स्वयंसेवकांची नियुक्ती करणार असून त्यांना फिल्ड सहाय्यक असे नाव देण्यात आले आहे.

स्मार्ट शहरांसाठी आम्ही स्मार्ट लाईटवर चालणाऱ्या बस सुरू केल्या असून या बस गाड्यांसाठी तिकीट प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन असेल. सुरुवातीला स्मार्ट बसमध्ये कंडक्टर असतील पण कालांतराने ते कमी करून संपूर्ण ई-तिकीट सुविधा सुरू होणार आहे.

पणजी शहरातील १८ बस स्टँडवर ई-तिकीट देण्याची सुविधा सुरू करणार असून क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटे उपलब्ध होणार आहेत. तसेच स्मार्ट सिटी अॅपवरूनही प्रवाशांना तिकिटे खरेदी करता येणार आहे. या ई-तिकिटांसाठी अॅप तयार करण्यात आले असून त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.      

हेही वाचा