पर्वरी येथे ईव्ही बसेससाठी चार्जिंग सेंटर : तुयेकर

पणजी येथे चार्जिंगची सुविधा असावी असा आम्ही प्रस्ताव मांडला आहे -तुयेकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 11:13 pm
पर्वरी येथे ईव्ही बसेससाठी चार्जिंग सेंटर : तुयेकर

पणजी : पर्वरी येथे इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार असून त्यासंबंधी आम्ही काम सुरू केले आहे. जसजशी बसेसची संख्या वाढत जाईल तसे संपूर्ण गोव्यात चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क तयार करणार असल्याची माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.

सध्या गोवा विद्यापीठ आणि कांपाल यामार्गावरील कदंब बससाठी चार्जिंग पॉइंट तयार केले आहेत. यात टप्प्याटप्प्याने वाढ करत असून पर्वरी येथे मोठे चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी आम्ही जागा निश्चित केली असून लवकरच तेथे अत्याधुनिक चार्जिंग सुविधा केंद्र उभारण्यात येईल अशी माहिती तुयेकर यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महामंडळाला ४८ बस मिळाल्या असून त्यापैकी फक्त ६ बस वापरण्यात आल्या आहेत. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने उर्वरित बस पुढील दोन महिन्यांत रस्त्यावर धावतील अशी माहिती तुयेकर यांनी दिली.
बसेसची संख्या वाढवण्यात आल्यावर आम्ही चार्जिंग पॉईंटची सुविधा देखील वाढवणार आहेत. महामंडळाकडे शंभर बसेस येणार असून त्यापैकी फक्त चार बस आल्या आहेत. मे पर्यंत कंपनी महामंडळाकडे सर्व बस पुरवणार होती मात्र अंतिम मुदतीत बस न दिल्याने आम्ही त्यांना रु. १ कोटींचा दंड ठोठावला असून सप्टेंबरपर्यंत ५० बस ताफ्यात दाखल होतील अशी माहिती तुयेकर यांनी दिली.

पणजी बसस्थानकावर चार्जिंग स्टेशनची सुविधा नसून फक्त येथे मडगाव बसस्थानकावर ही सुविधा सुरू आहे. पणजी येथे चार्जिंगची सुविधा असावी असा आम्ही प्रस्ताव मांडला असून म्हापसा बसस्थानकात देखील चार्जिंग स्टेशन बांधायला सुरुवात करणार असल्याची माहिती तुयेकर यांनी दिली. 

हेही वाचा