वाळपईत पावसाचे अर्धशतक पार

५०.४० इंच पावसाची नोंद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th July, 11:11 pm
वाळपईत पावसाचे अर्धशतक पार

पणजी : राज्यात १ जून ते ४ जुलै दरम्यान सरासरी ४१.६२ इंच पावसाची नोंद झाली आहे. या काळात साधारणपणे ४१.८७ इंच पावसाची नोंद होते. यंदा पावसाचे प्रमाण ०.६ टक्क्यांनी कमी झाले आहे. दरम्यान वाळपई येथे सर्वाधिक ५०.४० इंच पावसाची नोंद झाली आहे तर साखळी येथे ४९.५० इंच तर सांगे येथे ४८.६९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या चोवीस तासात १.६८ इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथे सर्वाधिक ४.६२ इंच पावसाची नोंद झाली. त्यानंतर सांगेत ३.२४ इंच, केपेत २.५१ इंच तर फोंड्यात २.४३ इंच पावसाची नोंद झाली. गुरुवारी पणजीत कमाल २९.६ अंश तर किमान तापमान २६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव येथे कमाल ३०.२ अंश तर किमान २६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २९ ते ३० अंश तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ५ ते ८ जुलै दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.            

हेही वाचा