म्हापश्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दीड लाखांचे पदार्थ जप्त

म्हापसा बस स्थानकावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd July, 04:50 pm
म्हापश्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दीड लाखांचे पदार्थ जप्त

म्हापसा: आंतरराज्यीय प्रवासी बसमधून होणारी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची वाहतूक रोखण्याच्या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हापसा आंतरराज्य बस स्थानकावर पुन्हा छापा टाकला आहे. महाराष्ट्रातून बस वाहतुकीमार्गे लेबेल नसलेले १५०  किलो पनीर व दही या पदार्थांसह ५० किलो तळलेला कांदा (फ्राईड ओनियन) असा दीड लाखांचा माल जप्त केला. ठाणे मुंबई यतेहून भेसळयुक्त पनीर पदार्थाची गोव्यात वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी हा छापा टाकला आहे. 

काही राज्यांमध्ये दुधाच्या फॅटला पर्याय म्हणून खाद्यतेल टाकून त्यापासून पनीर बनवतात आणि त्याची दुसऱ्या राज्यात विक्री केली वाजते. हे पनीर आरोग्यास हानीकारक असून असल्याचा अहवाल राष्ट्रीय स्तरावर प्राप्त झाला होता. 

मंगळवारी म्हापसा येथील आंतरराज्य बस स्थानकावर परराज्यातून आलेल्या सर्व अन्न पदार्थांच्या पार्सलची गुणवत्ता अधिकार्‍यांनी तपासली. यात ५०० किलो पनीर व १५० किलो दही आणि ५०  किलो तळलेला कांदा सापडला. पनीर म्हापशातील तर कांदा कळंगुटमधील व्यापार्‍याला पाठवण्यात येणार होता. अन्न सुरक्षा आणि पॅकेजिंग निकषांनुसार हे पदार्थ योग्य प्रकारे वाहून आणले नसल्याचे पाहणीत आढळून आले.

पडताळणीनंतर हे पदार्थ जप्त करण्यात आले व म्हापसा पालिकेच्या सहाय्याने या सर्व पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, या पथकाने म्हापसा शहरात खाद्य पदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांकडून रंगीत कापूस, कँडी जप्त केली व त्याचेही नमुने घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .