कोलव्यातील मारहाणप्रकरणी उपनिरीक्षकाला निलंबित करा

पोलिस अधीक्षकांची भेट घेत आमदार व्हेंझी यांची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd July, 04:24 pm
कोलव्यातील मारहाणप्रकरणी उपनिरीक्षकाला निलंबित करा

मडगाव : कोलवा पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकरने आठ दिवसांपूर्वी आल्मेदा नामक महिलेला बेदम मारहाण करत बूट चाटायला लावले. याप्रकरणी त्या पोलिसावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत केली. त्यानंतर महिलेकडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु होती.

 कोलवा पोलिसांकडून महिलेला मारहाणप्रकरणी आमदार व्हेंझी यांनी पोलिस अधीक्षक सावंत यांची भेट घेतली. काल सोमवारी आमदार व्हेंझी यांनी मारहाणीचा प्रकार उघड केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी याप्रकरणी तीन ते चार दिवसांत असा मारहाणीचा प्रकार घडलेला नाही असे सांगत आमदार व्हेंझी यांनाच याप्रकरणी ठोस माहिती देण्यास सांगितले होते.

मंगळवारी दुपारी आमदार व्हेंझी यांनी पोलिस अधीक्षक सावंत यांची भेट घेतली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, पोलिस निरीक्षक सतिश पडवळकर उपस्थित होते. आमदार व्हिएगस यांनी पोलिसांची भेट घेत घटनाक्रम विषद करत सदर पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर याला बडतर्फ करण्याची मागणी केली. पोलिसांच्या भेटीनंतर बोलताना आमदार व्हेंझी यांनी सांगितले की, कोलवा पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांच्याकडून महिलेला मारहाणीची घटना आठ ते दहा दिवसांपूर्वीची आहे.

नुवे व बाणावली मतदारसंघांच्या सीमेवर अपघात किंवा खंडणी मागण्याचा जो काही प्रकार झालेला असेल त्यावर कारवाई करण्याबाबत किंवा त्याची चौकशी करण्याच्या मुद्द्याचा प्रश्न नाही ती कारवाई पोलिसांकडून करण्यात यावी. पण महिलांना हात लावण्याचा, त्यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारण्याचा व बुट चाटायला लावण्याचा प्रकार पोलिसांना बदनामकारक आहे. संशयित असल्यास चौकशीअंती कायद्यानुसार कारवाई करावी पण महिलेला हाताळण्यासाठी महिला कॉन्स्टेबल असताना पोलिस उपनिरीक्षकाने हात लावणे, मारहाण करणे चुकीचे आहे.

आल्मेदा नामक महिलेला मारहाण झालेली असून कोलवा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांनी मारहाण केल्याचे पोलिस अधीक्षक सावंत यांना सांगितलेले आहे. याप्रकरणी आता वकिलांसह मारहाण झालेल्या पीडित महिलेकडून पोलिस तक्रार दाखल केली जात असल्याचेही आमदार व्हेंझी य‍ांनी सांगितले.