पोटच्या कोवळ्या मुलांना फिनाईल पाजत आईचा आत्महत्येचा प्रयत्न

पर्वरी सुकूर येथे धक्कादायक घटना; तिघांवर इस्पितळात उपचार सुरू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd July, 04:03 pm
पोटच्या कोवळ्या मुलांना फिनाईल पाजत आईचा आत्महत्येचा प्रयत्न

म्हापसा : कौटूंबिक वादातून आईने स्वतः आणि आपल्या ३ व ५  वर्षांच्या कोवळ्या मुलांना फिनाईल पाजल्याची धक्कादायक घटना आराडी, सुकूर-पर्वरी येथे घडली आहे. मुलांवर गोमेकॉत तर संशयित आईवर पर्वरीतील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

 ही घटना सोमवारी १  रोजी रात्री घडली. मूळ गदग कर्नाटक येथील हदिमनी कुटूंब आराडी सुकूर येथे वास्तव्यास आहे. सोमवारी ११.३० च्या अगोदर संशयित महिलेने स्वतः फिनाईल प्राशन करत ते आपल्या ३ आणि ५  वर्ष वयाच्या दोन मुलांना सेवन करण्यास दिले. 

या घटनेनंतर तिघांचीही प्रकृती खालावली. ती भानावर आली असता आपल्या हातून गंभीर चूक घडल्याची जाणीव व पश्चाताप तिला झाला. त्यानंतर तिने पती व नातेवाईकांना फोन करीत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पती व नातेवाईकांनी तिच्या घरी धाव घेतली. 

तिघांचीही प्रकृत्ती त्यावेळी अस्वस्त होती. लगेच त्यांना पर्वरीतील ेका खासगी इस्पितळात दाखल केले. तिथून दोन्ही मुलांना बांबोळीला गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे या दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत. तर संशयित महिलेवर त्या खासगी इस्पितळातच उपचार सुरू आहेत. 

 घटनेची माहिती मिळाल्यावर पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच संशयित महिलेचे पती शिवनगौडा हदिमनी यांच्या तक्रारीच्या मंगळवारी दुपारी पोलिसांनी संशयित महिलेवर  आपल्या दोन अल्पवयीन मुलांना फिनाईल पाजून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता कलम १०९  व गोवा बाल कायदा कलम ८(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 दरम्यान, हे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहे. संशयित महिलेने हे कृत्य रागाच्या भरातून केले असून हदिमनी कुटूंबामधील कौटूंबिक वादामुळे संशयित महिलेचा राग अनावर झाला असावा व त्यातूनच तिच्याकडून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरेन सिक्वेरा करीत आहेत.