कोलवा पोलिस ठाण्यात मारहाणीचा प्रकार घडला नाही- पोलिस अधीक्षक

चौकशीअंती पोलिस अधीक्षकांकडून स्पष्ट : आमदारांना माहिती उपलब्ध करण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd July, 02:09 pm
कोलवा पोलिस ठाण्यात मारहाणीचा प्रकार घडला नाही-  पोलिस अधीक्षक

मडगाव : आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या दाव्यानुसार चौकशी केली असता मागील ३-४ दिवसांत कोलवा पोलिस ठाण्यात महिलेला मारहाणीची घटना घडलेली नाही, असे दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले. आमदारांनी या संदर्भात आवश्यक माहिती पुरवल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, सावंत यांनी सांगितले.

या बाबत आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एक महिला कैफियत देण्यासाठी कोलवा पोलिस स्‍थानकावर गेली असता पोलिस ठाण्यातील एका पोलिा उपनिरीक्षकाने तिला धमकावले व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तिला आपले बूट चाटण्यास सांगत पुन्हा अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या अंगावर काळेनिळे डाग उमटले आहेत. याप्रकरणी आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी दक्षिण गोव्‍याच्‍या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांच्याकडे सदर प्रकरणी चौकशी करुन यात गुंतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला त्‍वरित निलंबित करण्याची मागणी केल होती. 

या प्रकरणी बोलताना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी 'असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार व्हेंझी यांनी केलेल्या आरोपानुसार मागील तीन ते चार दिवसांतील कोलवा पोलिस ठाण्यातील घटनांची चौकशी केली असून तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला मारहाण करण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. आमदार व्हेंझी यांनी या प्रकरणी आणखी काही आवश्यक माहिती दिल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही सुनीता सावंत यांनी दिली आहे. .