‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर दमरदार एन्ट्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th June, 12:43 am
‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर दमरदार एन्ट्री

गुरुवारी ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जागतिक बॉक्सऑफिसवर २०० कोटींची कमाई केली असून भारतात १४० कोटींचा आकडा पार केला आहे. यासोबतच शुक्रवारी ओटीटी आणि ​थिएटरमध्ये अनेक चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित होणार आहेत.


कल्कि २८९८ एडी : थिएटर :
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट कल्की २८९८ एडी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर हा चित्रपट देशातच नाही तर परदेशातही आगाऊ बुकिंगचे रेकॉर्ड मोडत आहे. कल्की २८९८ एडीने पहिल्या दिवशी जगभरात सुमारे २०० कोटीचा आकडा पार केला आहे. तर भारतात १४० कोटींची दमदार ओपनिंग मिळाली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या तेलुगू राज्यांमध्ये या चित्रपटाची कमाई १०० कोटी रुपये आहे. कल्की सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसरा आहे. आतापर्यंत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम आरआरआरच्या नावावर आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २२३.३ कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी, प्रभासचा चित्रपट बाहुबली २ सर्वांत मोठ्या ओपनरमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने २१४ कोटींची कमाई केली होती. त्यापाठोपाठ कल्कीचा नंबर लागला आहे. हा चित्रपट हिंदू पौराणिक कथेवर आधारीत आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि शोबाना यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. कमल हासन आणि अमिताभ बच्चन त्यांच्या १९८५ च्या गिरफ्तार चित्रपटानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.


जट आणि ज्युलिएट ३ : थिएटर : 

दिलजीत दोसांझ आणि नीरू बाजवा यांचा जट अँड ज्युलिएट फ्रँचायझीचा तिसरा भाग गुरुवारी प्रदर्शित झाला. ही रोमँटिक कॉमेडी दोन पोलिस अधिकाऱ्यांभोवती फिरते जे एका मिशनवर पॅरिसला जातात आणि नंतर त्यांचे आयुष्य कलाटणी घेते. जगदीप सिद्धू लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात नासिर चिन्योती, बीएन शर्मा, राणा रणबीर आणि एलेना यांच्या प्रमुख भूमिका आहेत


अ क्वाईट प्लेस : थिएटर
हा भयपट शुक्रवारी ​चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मायकेल सरनोस्की दिग्दर्शित आणि लुपिता न्योंग'ओ, जोसेफ क्विन आणि डिजीमॉन हौनसौ अभिनीत, हा चित्रपट 'अ क्वाइट प्लेस' फ्रँचायझीचा स्पिन-ऑफ प्रीक्वल आहे.


पॅराडाईज : थिएटर :
हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात झळकणार आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये अनेक पुरस्कार जिंकणारा हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. श्रीलंकन ​​समाजातील गुंतागुंत आणि बारकावे दर्शविल्याने समीक्षकांनी श्रीलंकन ​​दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेतील परिस्थिती या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.


आय एम: सेलिन डायन :अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ:
ऑस्कर नामांकित आयरीन टेलरद्वारे दिग्दर्शित, कॅनेडियन गायिका सेलीन डायनवरील ही अमेरिकन डॉक्युमेंटरी आहे. तिने जिंकलेले असंख्य पुरस्कार आणि चार्ट-टॉपिंग हिट्सच्या पलीकडे जाऊन तिचे आयुष्य दिग्दर्शकाने दाखवले आहे.


माय लेडी जेन: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
माय लेडी जेन नावाच्या पुस्तकावर आधारीत ही ऐतिहासिक मालिका आहे. १५५३ मध्ये अनपेक्षितपणे नऊ दिवसांत इंग्लंडच्या राणीचा राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी संकटात सापडलेल्या जेन नावाच्या मुलीवर ही मालिका केंद्रित आहे. राजकीय वावटळीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी जेन धडपडत असते. एमिली बॅडर या मालिकेत जेनच्या भूमिकेत आहे.

सुपासेल : नेटफ्लिक्स :
रॅपमन (अँड्र्यू ओनवुबोलू) यांचा ‘सुपासेल’ सुपरहिरो शैलीतील ही मालिका आहे. ही मालिका दैनंदिन ब्लॅक लंडनवासीयांच्या समूहाभोवती फिरते जे विलक्षण क्षमता आणि त्यांच्या नवीन शक्तींशी जुळवून घेण्यासाठी संघर्षांचा शोध घेतात. या मालिकेत टॉसिन कोल, नादिन मिल्स, एरिक कोफी अबरेफा, केल्विन डेम्बा आणि ॲडेलयो एडेडायो यांच्या भूमिका आहे.
अ फॅमेली अफेअर : नेटफ्लिक्स :
निकोल किडमन, जॉय किंग आणि झॅक एफ्रॉन अभिनीत, हा रोमँटिक कॉमेडी आणि कौटुंबिक चित्रपट आहे. कथा झारा (जॉय किंग) भोवती केंद्रित आहे, एक तरुण स्त्री जिला तिचा बॉस, ख्रिस कोल (झॅक एफ्रॉन) भेटतो. त्याचे झाराच्या आईशी संबंध आहेत. रिचर्ड लॅग्रॅव्हेनीज दिग्दर्शित आणि कॅरी सोलोमन लिखीत विनोदी चित्रपट आहे.


रौतू का राज :झी ५ :
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी इन्स्पेक्टर दीपक नेगीच्या भूमिकेत आहे, जो अंध शाळेतील वॉर्डनच्या हत्येचा तपास करतो. आनंद सुरापूर दिग्दर्शित हा चित्रपट खऱ्या राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक टोलेबाजी करतो.


शर्माजी की बेटी: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
शर्मा आडनाव असलेल्या आधुनिक, मध्यमवर्गीय, शहरी महिलांच्या जीवनातील समानता आणि विरोधाभास अधोरेखित करणारा हा विनोदी चित्रपट बहु-पिढ्यांमधील फरक दर्शवतो. बहु-पिढ्यांचे नाते, बहीणभाव आणि परंपरा आणि महत्त्वाकांक्षा यांचे संतुलन दिग्दर्शकाने या चित्रपटात साधले आहे.