सायबर गुन्हेगारीपासून नागरिकांनी सावध राहावे!

Story: अंतरंग |
17th June, 12:11 am
सायबर गुन्हेगारीपासून नागरिकांनी सावध राहावे!

कोविडनंतर बँक व इतर आर्थिक व्यवहार मोबाईल अॅप तसेच ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. अशा ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमुळे गुन्हेगारांचे आयतेच फावले आहे. गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. अशाच प्रकारे मागील आठवड्यात राज्यातील अनेक पालकांना फोन करून त्यांच्या मुलांना ड्रग्ज व इतर अनैतिक प्रकरणांत अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याची दखल घेऊन गोवा पोलिसांनी नेहमीप्रमाणे नागरिकांना सतर्क राहून फसवणुकीला बळी पडू नका, असे सांगितले आहे. याशिवाय नागरिकांनी अशा प्रकारचे कॉल आल्यास प्रथम पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. असे असताना मागील आठवड्यात +९२ क्रमांक किंवा इतर अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून मुलांच्या पालकांना व्हॉटस्अप कॉल करत मुलांचे अपहरण केल्याची माहिती दिली. तसेच संबंधितांनी मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. दक्षिण गोव्यातील वेर्णा, नुवे, लोटली, नावेली, चिंचणी भागातील पालकांना मुलांचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय वरील गुन्हेगार जास्त करून हिंदी भाषेत बोलत होते. यावेळी जागृत पालकांनी संबंधितांकडे कोकणीत बोलल्यानंतर तसेच स्थानिक पोलीस स्थानकाची माहिती मागविल्यानंतर गुन्हेगार गडबडले आणि त्यांनी कॉल बंद केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांना वरील प्रकार बनावट असल्याचे समजल्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि बळी पडण्यापासून अनेक पालक वाचले.

सायबर गुन्हेगारीबाबत पोलिसांनी गेल्या आठवड्यात नागरिकांमध्ये जागृती सुरू केली आहे. त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून सुरू होणारे कॉल उचलू नयेत. याशिवाय त्यांना पैसे यूपीआय किंवा ऑनलाईन पद्धतीने देऊ नयेत. तसेच असे कॉल आल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला किंवा नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याच्या सूचना पोलिसांनी पालकांना केल्या आहेत.

आजच्या काळात इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण आपली अनेक दैनंदिन कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने करतो. जीवनात तंत्रज्ञानाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट, कॉम्प्युटर, मोबाईल यासारख्या गॅझेट्सचा वापर केला जात आहे. आज आपल्याला घरी बसून ऑनलाइन खरेदी करायची असेल किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्‍तीला पैसे ट्रान्स्फर करायचे असतील, तर या सर्व गोष्टी आपण आपल्या संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने कुठूनही करू शकतो. कोविडनंतर आपण बँकिंग, शिक्षण आणि सेवा क्षेत्रांशी संबंधित अनेक कामे ऑनलाईन करत आहोत. त्यामुळे अशा गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी मोबाईल फोनवर असलेले अनावश्यक अॅप्स काढून टाकले पाहिजेत. 

तसेच या अॅप्सला दिलेली गरज नसलेली परवानगी काढून टाकायला हवी. फोनवर संदेश, व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईट्सवरून येणाऱ्या लिंक्स उघडताना आधी त्या व्यवस्थित पहा, दिशाभूल करणारे संदेश ओळखा. कोणी काहीही फुकट देत नाही, हा कानमंत्र लक्षात ठेवून सायबर गुन्हेगारीपासून नागरिकांनी सावध राहावे.

प्रसाद शेट काणकोणकर