बायडनना धक्का; बेकायदा बंदूक प्रकरणात मुलगा दोषी!

Story: विश्वरंग |
14th June, 11:01 pm
बायडनना धक्का; बेकायदा बंदूक प्रकरणात मुलगा दोषी!

अमेरिकेतील आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, ही निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना जो बायडन यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना दोषी ठरवण्यात आले आहे. अवैधपणे शस्त्र खरेदी करणे आणि अमली औषधांचा वापर करण्यासंदर्भात खोटे बोलल्याप्रकरणी हंटर बायडन दोषी आढळले आहेत. या प्रकरणात हंटर बायडन यांना २५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही अध्यक्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कोर्टाने निर्णय जाहीर केला आहे. ५४ वर्षांच्या हंटर बायडनने २०१८ मध्ये ३८-कॅलिबर कोल्ट कोबरा रिवॉल्वर खरेदी केले होते. हे रिवॉल्वर खरेदी करताना त्यांनी अमली पदार्थांच्या उपयोगाबाबत खोटी माहिती दिली होती. त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत. हंटर बायडन यांनी त्यावेळी आरोपांचा इन्कार केला होता. हंटर बायडन यांना दारू आणि क्रॅक कोकेनचे व्यसन होते. आता हंटर बायडन यांना दोषी ठरवल्याने जो बायडन यांच्या निवडणूक मोहिमेवर परिणाम होणार का, हे पाहावे लागेल.

न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हंटर बायडन भावूक झाले होते. हंटर बायडन त्यांच्या वकिलांची गळाभेट करताना दिसून आले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या प्रकरणाविषयी बोलताना म्हटले की, ते न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करतात. लवकरच वरच्या कोर्टात अपील करणर आहे, असे जो बायडन यांनी म्हटले. आम्ही आमच्या मुलावर खूप प्रेम करतो. देशात अनेक कुटुंब आहेत जी व्यसनासोबत संघर्ष करत आहेत. तुमच्या कुटुंबातील व्यक्ती व्यसनातून किंवा नशा करण्याच्या गोष्टीतून बाहेर येणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. हंटर बायडनला देखील न्याय मिळेल, ही आशा आहे, असे जो बायडन म्हणाले. सर्व कायदेशीर प्रक्रियांचा सन्मान करत असल्याचे जो बायडन म्हणाले.

बायडन त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मुलगा हंटर बायडनला माफ करू शकतात. त्यांच्याकडे दोषींना माफ करण्याचा अधिकार आहे. मात्र, जो बायडन यांनी मुलाला माफ करणार नसल्याचे म्हटले होते. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना देखील एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले आहे.

हंटर बायडेन यांच्यावर दोन खटले चालू असून त्यातल्या एका खटल्यात ते दोषी ठरवले गेले आहेत. हंटर यांच्यावरील दुसरा आरोप हा वेळेत कर न भरल्याचा आहे. या आरोपावरून त्यांच्यावर कॅलिफोर्नियामध्ये खटला चालू आहे. या खटल्याची सुरुवात सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

जो बायडन सध्या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. आगामी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत आहेत. ते पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. जो बायडन यांच्याकडून २०२० मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.


 - सुदेश दळवी, गोवन वार्ता