केशव महाराज मॅचविनर : शेवटच्या षटकात केला ११ धावांचा बचाव
न्यूयॉर्क : आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील २१ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर थरारक विजय मिळवला. केशव महाराजने शेवटच्या षटकात ११ धावांचा बचाव करत दक्षिण आफ्रिकेला विजयी केले.
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला विजयासाठी ११४ धावांचे आव्हान दिले होते. बांगलादेशने झुंज देत सामना २० व्या षटकापर्यंत आणला. बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. तेव्हा केशव महाराजने शेवटचे षटकात अवघ्या ४ धावा देत २ बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे ४ धावांनी थरारक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह विजयाची हॅट् ट्रिक पूर्ण केली.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीस आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारच खराब झाली, पण हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या ७९ धावांच्या भागीदारीने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. हेनरिक क्लासेनने ४४ चेंडूत ४६ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
दुसरीकडे, डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये बांगलादेशने चांगली गोलंदाजी केली, पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी वर्चस्व गाजवले. बांगलादेशसाठी, विशेषत: तनझिम हसन शाकिब अत्यंत घातक गोलंदाजी करताना दिसला.
याआधी, दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली कारण पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्स गोल्डन डकवर बाद झाला. त्याला तंजीम हसन साकिबने बाद केले. यानंतर साकीबने क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांचीही विकेट घेतली. डी कॉक १८ धावा करून बाद झाला.