भाजपचे शल्यः आयात केलेले आमदार ठरले निष्प्रभ

गोव्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हा पुढे बरीच वर्षे चर्चेचा विषय राहणार आहे. राजकीय क्षेत्रात आणि सर्वसामान्य जनतेतही बराच काळ या निकालाची चर्चा होत राहील. पुढील काही दिवस याचे तोंडी आणि लेखी विश्लेषणही होत राहील. जेवढे सायलंट राहून मतदारांनी मतदान केले, तेवढ्याच उत्स्फूर्तपणे निकालानंतर मतदारांनी व्यक्त होऊनही दाखवले.

Story: उतारा |
09th June, 05:30 am
भाजपचे शल्यः आयात केलेले आमदार ठरले निष्प्रभ

यावेळी उत्तर गोव्यात भाजपच्या उमेदवाराविषयी एवढी नाराजी होती की, इथे श्रीपाद नाईक जिंकले तर वीस- तीस हजारांच्या फरकाने असेच मानले जायचे. भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र मतांची आघाडी ही एक लाख असेल, असे म्हटले होते. इतर राजकीय जाणकारांनी श्रीपाद नाईक अगदी कमी फरकाने जिंकतील, असा दावा केला होता. कोणीच श्रीपाद नाईक यांच्याविषयी चांगले बोलत नव्हते. मात्र शेवटी निकालात श्रीपाद नाईकच उजवे ठरले. भाजपचा त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णयही सार्थ ठरला. चार-पाच नवे दावेदार असतानाही भाजपने सहाव्यांदा श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी देण्यामागे निश्चित विजय हा एक मापदंड होताच. उत्तर गोव्यासाठी घेतलेला निर्णय योग्य ठरला. काँग्रेसचे उत्तर गोव्याचे गणित चुकत गेले. रमाकांत खलप हे बरीच वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेला एखादा नेता किंवा सुनील कवठणकरसारख्या युवा नेत्यालाही उमेदवारी दिली असती तर मोठा फरक दिसला असता. किंवा दुसरा योग्य पर्याय काँग्रेसजवळ होता तो म्हणजे आरजीपीला इंडिया गटात घेऊन मनोज परबांवर डाव लावायला हवा होता. तसे झाले असते तर इंडि आघाडीला उत्तर गोव्यातील जागाही मिळण्याची शक्यता वाढली असती.

श्रीपाद नाईक जिंकणार होते पण एवढी मोठी आघाडी घेतील असे कोणालाही वाटत नव्हते. सत्तरी आणि डिचोलीने नाईक यांचा विजय पक्का करताना तिथल्या पाच मतदारसंघांतून ९२ हजार मते दिली. या मतांनीच नाईक यांना सुरक्षित केले. कारण त्या पाच मतदारसंघांमध्ये काँग्रेसला फक्त २३ हजार मते मिळाली. हा फरक सुमारे ६८ हजार मतांचा होता. काँग्रेसने सांताक्रुझ वगळता कुठेही पाच अंकी आकडा गाठलेला नाही. सांताक्रुझमध्येच १०,६८८ मते मिळाली आहेत. इतर मतदारसंघांमध्ये १० हजारांपेक्षा कमीच मते आहेत. भाजपला उत्तर गोव्यात १४ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे उत्तर गोवा गेल्या सहा निवडणुकांमध्ये भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ झाला आहे. इथे इंडि आघाडीचा फक्त एक आमदार होता. इंडिचे इतर नेते निष्प्रभ, तेजोहीन ठरले. त्यामुळेच श्रीपाद नाईक यांनी आपल्याबाबत असलेल्या नाराजीवर मात करून १ लाख ११ हजार मतांची आघाडी मिळवली. खलप यांना १.४१ लाख मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि इंडि आघाडीचा निष्काळजीपणा त्यांना भोवला.

उत्तर गोव्यात आरजीपीने कमालीचे प्रदर्शन केले. आरजीपीला मते मिळणार नाहीत, असे सरकारमधील काही नेते सांगत होते. उत्तर गोव्यात आरजीपीने विधानसभा निवडणुकीइतकीच आपल्या मतांची संख्या ठेवली आहे. उत्तर गोव्यातील नऊ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी २ हजारपेक्षा जास्त मते आरजीपीचे उमेदवार मनोज परब यांना मिळाली आहेत. पणजी, साखळी, पर्वरी वगळता इतर सर्व मतदारसंघांमध्ये १ हजारपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आरजीपीने या निवडणुकीत ४५ हजार मते मिळवली. काँग्रेसने उमेदवार देण्यात उशीर केला. आरजीपीलाच इंडि आघाडीचा घटक केला असता तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसले असते.

दक्षिण गोव्यातील निवडणूक यावेळी बरीच चर्चेत राहिली. देशभरातील प्रसारमाध्यमांचे लक्षही दक्षिणेतील निवडणुकीकडे होते. देशातील पहिल्या तीन-चार श्रीमंत उमेदवारांमध्ये दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो होत्या. दुसऱ्या बाजूने संविधानाविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्यावर खुद्द पंतप्रधानांनीही टीका केली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांच्याच नजरा होत्या. भाजपने आपल्या पदाधिकाऱ्यांचा धेंपो कुटुंबाकडे मोर्चा वळवला. दिल्लीत झालेल्या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांना पल्लवी धेंपो यांना उमेदवार म्हणून पुढे करावे लागले. तेव्हापासूनच भाजपमध्येही दक्षिण गोव्याविषयी चलबिचल सुरू झाली. पक्षातील काहीजणांनी पल्लवी धेंपो यांच्या विरोधात काम केले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, दक्षिणेतील भाजपचे आणि भाजपसोबत असलेले १४ आमदार पल्लवी धेंपो यांच्या प्रचारासाठी दिवसरात्र फिरत होते. भाजपकडे ग्रामपातळीवर सदस्यांचे मोठे कॅडर आहे. असे असतानाही पल्लवी धेंपो यांना पराभव पत्करावा लागला. त्या ६० हजार मतांनी जिंकतील असा दावा आणि तशी गणितेही भाजपने मांडली होती. पण सासष्टी आणि मुरगाव, केपेतील मतदारांनी काँग्रेसला साथ दिली. या तीन तालुक्यांतील मतांची आघाडी मोठी होती त्यामुळे इतर काणकोण, सांगे, धारबांदोडा, फोंडा या तालुक्यांतील मतदारसंघांमधून भाजपला आघाडी मिळूनही काही फरक पडला नाही. भाजपकडे असलेले आमदार, धेंपो ब्रँड, प्रचाराच्या दोन फेऱ्या इतके करूनही भाजपला तिथे विजय मिळवता आला नाही. त्या उलट काँग्रेसने प्रचाराची धड एक फेरी पूर्ण केली नव्हती. गावोगावी न जाता भाजपच्या बालेकिल्ल्यांंमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसला चांगली मते मिळाली. काणकोण, सांगे, सावर्डे, कुडचडे, फोंडा, शिरोडा या भाजपच्या सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने सुमारे ४८ हजारांपेक्षा जास्त मते मिळवली. केपेत काँग्रेसला ११,९३७ मते मिळाली. सासष्टीत काँग्रेसने आठ मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारापेक्षा थेट दुप्पट मते मिळवली त्यामुळे सासष्टीनेच काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी केले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

सासष्टीतील नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी या आठ मतदारसंघांमध्ये काँग्रेसला १.१३ लाख मते मिळाली. विशेष म्हणजे कुडतरीचे आमदार भाजपसोबत आहेत. मडगाव, नावेली, नुवे या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. मडगावमध्ये दिगंबर कामत यांनी भाजपला सुमारे तेराशे मतांची आघाडी दिली आहे. सासष्टीतल्या इतर मतदारसंघांत काँग्रेसने बाजी मारली. भाजपला सासष्टीत सुमारे ५० हजार मते मिळाली. दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघांपैकी ११ मतदारसंघांमध्ये भाजपला मतांची आघाडी मिळाली असली तरी या अकरा मतदारसंघांवर इतर नऊ मतदारसंघांनी मात केली. मुरगावमधील चार मतदारसंघांत भाजपने सुमारे ४२,५०० मते मिळवली तर काँग्रेसला तिथे सुमारे ३६,४०० मते मिळाली. सुदीन ढवळीकरांच्या मडकई मतदारसंघातून भाजपला १४ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. तो एकमेव मतदारसंघ आहे जिथे काँग्रेसला ३,९७४ इतकी म्हणजेच सर्वांत कमी मते मिळाली. भाजपच्या इतर अनेक मंत्री, आमदारांनी भाजपची निराशा केली आहे. या सगळ्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये दिसणार आहे हे नक्की. मंत्रिमंडळात निश्चित असलेले फेरबदल हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणार होते. या निकालाने भाजपलाही खूप काही शिकवले आहे. सरकार चालवण्यासारखे संख्याबळ असताना काँग्रेस फोडण्याच्या नादात भाजपने काही नेत्यांना पक्षात घेतले. पण यातील अनेकांचा भाजपला फायदा झालेलाच नाही. त्यातील काहींच्या मतदारसंघात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपचा हेतू सफल झालेला नाही. उलट आयात केलेल्या आमदारांमुळे भाजपसाठी आयुष्य खर्ची घातलेले कॅडरचे कार्यकर्ते बिचारे देशोधडीला लागले.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील मतदारांनी भाजपला धडा शिकवला. यात धार्मिक संस्थांकडून झालेला हस्तक्षेपही कारणीभूत असेल. एकंदरीत दक्षिण गोव्यातील मडकई वगळता इतर सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेसला जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. ज्या मतदारसंघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला विधानसभेत आमदारही निवडून आणता आलेला नाही, तिथेही मतदारांनी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला भरघोस मते दिली आहेत. सासष्टीत, मुरगावमध्ये असलेला अल्पसंख्याक मतदार असो किंवा काणकोण, सांगे, सावर्डे, केपे या मतदारसंघांमध्ये असलेला आदिवासी समाजातील मतदार असो. या सर्वच मतदारसंघांमध्ये काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावरून भाजपचे दक्षिण गोव्यातील कॅडर, आमदार, मंत्री हे सगळेच प्रभावहीन ठरले आहेत हे स्पष्ट आहे. भाजपला या पराभवाचे शल्य बराच काळ राहणार आहे. लोकही गोव्याच्या निवडणुकीच्या इतिहासातील दक्षिण गोव्यातील ही लढत लवकर विसरणार नाहीत.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत. मो. ९७६३१०६३००