कोल्हापूरकरांचे मत गादीलाच; छत्रपती शाहू महाराज विजयी

महायुतीचे संजय मंडलिक पराभूत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th June, 12:50 am
कोल्हापूरकरांचे मत गादीलाच; छत्रपती शाहू महाराज विजयी

कोल्हापूर : अठराव्या लोकसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात भाजप आघाडीवर असून त्यापाठोपाठ ठाकरे गट व काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट आहेत. कोल्हापूरमध्ये निवडणूक लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक रिंगणात उतरले होते. यात महाविकास आघाडीची छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. १९५२ साली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणूक झाली. ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे कॉंग्रेसने दहा वेळा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड सर्वाधिक पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्याचवेळी सदाशिवराव मंडलिक हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले. ते एकदा काँग्रेस, दोनदा राष्ट्रवादीतून आणि एकदा अपक्ष म्हणून खासदार झाले.

यावेळी महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीकडून संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत होती. यात छत्रपती शाहू महाराज यांनी बाजी मारली. त्यांनी १४६२३५ मतांनी बाजी मारली.

याशिवाय बसपचे संजय मगडे त्याशिवाय इतर पक्षाचे बाजीराव खाडे, मुश्ताक अजीज मुल्ला, माधुरी राजू जाधव, संदीप भैरवनाथ कोगले, कृशनाबाई, दीपक चौगुले, अॅड. यश सुहास हेगडेपाटील, नागेश पुंडलिक बेनके, बी. टी. पाटील, राजेंद्र बालासो कोली, डॉ. सुनील नामदेव पाटील, संतोष गणपती बिसुरे, मंगेश जयसिंग पाटील, सुभाष वैजू देसाई, कृष्णा हणमंत देसाई, अरविंद भिवा माने, शशीभूषण देसाई, इरफान चांद, संदीप संकपाळ, कुदरतुल्ला आदम लतीफ, समलीम बागवान हेही निवडणूक रिंगणात होते.

निकालाआधीच झळकले विजयाचे पोस्टर

मतदानाच्या दिवशीही छत्रपतींचा प्रभाव दिसून आला. निकालाच्या आदल्या दिवशी खासदार म्हणून पोस्टर झळकले होते. या पोस्टरवर ‘कोल्हापूरचा राजा, शाहू महाराज छत्रपती खासदार’ असा मजकूर आहे. मिरजकर तिकटी परिसरात हे पोस्टर लावण्यात आले.

हेही वाचा