जलस्रोत खात्यातर्फे बंधारे प्लेट्स काढण्याचे कामही सुरू
जलस्रोत खात्यातर्फे मशिनद्वारे नाल्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू.
डिचोली : डिचोली जलसंसाधन खात्यातर्फे डिचोली तालुक्यात नदीतील गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आले असून सदर काम आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता विनोद भंडारी यांनी दिली.
डिचोली-साखळी नाला तसेच डिचोली येथील शांतादुर्गा सर्कल, सुपाची पूड, हरवळे, सौसरवाडा आदी ठिकाणी कामे हाती घेण्यात येणार आहेत. दरम्यान, तोनेश्वर मंदिर परिसरातील नाला, दबेलवाडा येथील नाल्यातील गाळ उपसण्यात आला असून उर्वरित सर्व कामे येत्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे अभियंता विनोद भंडारी यांनी सांगितले.
पावसात येथे पुराचा धोका असतो. अनेक नाले साचल्याने जलस्रोत खात्यातर्फे दरवर्षी सफाई करण्यात येते व गाळ मशीन घालून काढला जातो. यावर्षी काम सुरू केले असून आठवडाभरात ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बंधारे खुले करण्याचे काम सुरू
डिचोली तालुक्यातील सुमारे वीस बंधाऱ्यांची प्लेट्स काढण्याचे कामही हाती घेण्यात आले असून हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.