तब्बल ६१३ दिवस दिली करोनाशी झुंज, अखेर झाला मृत्यू... वाचा सविस्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 04:09 pm
तब्बल ६१३ दिवस दिली करोनाशी झुंज, अखेर झाला मृत्यू... वाचा सविस्तर

एमस्टरडम : करोना महामारीने जगभरात कोट्यवधी लोकांचे प्राण हिरावले. यातून कुठेतरी जग सावरत आहे. पण, या महामारीची दहशत अजूनही कायम आहे. कारण ज्यांची रोग प्रतिकारक क्षमता अत्यंत कमकुवत आहे, त्यांच्यासाठी करोना म्हणजे यमदूतच आहे. डचमधील ७२ वर्षीय व्यक्तीने या करोनाशी तब्बल ६१३ दिवस झुंज दिली. मात्र, रोग प्रतिकारक क्षमता कमकुवत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक काळ संसर्गात राहिलेला हा रुग्ण म्हणून संशोधकांनी त्याची दखल घेतली आहे.

नेदरलँडच्या ॲमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी या व्यक्तीवर संशोधन केले आहे ६१३ दिवस ही व्यक्ती करोनाबाधित राहिली. २०२३ च्या उत्तरार्धात त्याचा मृत्यू झाला. या ७२ वर्षीय व्यक्तीला फेब्रुवारी २०२२ मध्ये कोविड-१९ ची लागण होण्याआधीच रक्ताच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. पुढील आठवड्यात बार्सिलोना येथे होणाऱ्या जागतिक वैद्यकीय परिषदेत या रुग्णाची केस संशोधकांकडून मांडली जाणार आहे.

५० पेक्षा जास्त वेळा विषाणूने बदलले आपले स्वरूप

करोना विषाणू रुग्णाच्या शरीरात ५० पेक्षा जास्त वेळा उत्परिवर्तित झाला आणि अखेरीस अल्ट्रा-म्यूटेटेड प्रकारात बदलला. हा विषाणू सुमारे २० महिने त्याच्या शरीरात राहिला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संसर्ग आहे. यापूर्वी ब्रिटनमधील करोनाबाधिताचा ५०५ दिवसांनी मृत्यू झाला होता.

ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग होण्यापूर्वी COVID-19 लसींचे अनेक डोस डच व्यक्तीने घेतले होते. तरीही रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यात यश आले नाही. हा विषाणू कालांतराने अधिक मजबूत झाला. यामुळे सोट्रोविमॅब या प्रमुख कोविड अँटीबॉडी उपचारांसह इतर उपचारांवर त्याचा परिणाम झाला नाही. मात्र, हा प्रकार रुग्णाच्या पलीकडे पसरला नाही, असेही संशोधकांना आढळून आले आहे. 

हेही वाचा