शेजारच्या राज्यांतून ढग आल्यावरच पणजी वेधशाळेला येतो पावसाचा अंदाज!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 12:40 pm
शेजारच्या राज्यांतून ढग आल्यावरच पणजी वेधशाळेला येतो पावसाचा अंदाज!

पणजी : जनतेला हवामानाची अचूक स्थिती समजावी, यासाठी हवामान खात्याकडे अद्ययावत यंत्रणा आहे. तरीही पणजी हवामान खात्याला आज (ता. २०) गोव्यात मुसळधार पाऊस पडेल, याची पाऊस पडेपर्यंत पुसटशीही कल्पना आली नाही. यामुळे सगळेच अचंबित झाले. मात्र, यावर पणजी हवामान खात्याचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘शेजारी राज्यांवर आकाशात ढग दाटल्यास आणि ते गोव्याच्या दिशेने सरकत असल्याचे दिसून आल्यास पावसाचा अंदाज सांगणे शक्य असते. पण, गोव्यातच आकाशात ढग जमा झाल्यास पाऊस पडेल की नाही, हे सांगता येत नाही’, असे उत्तर नहुष कुलकर्णी यांनी ‘गोवन वार्ता’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे.


कोट्यवधी रुपये खर्चून हवामान खात्याची यंत्रणा चालवली जाते. अवकाशातील बारीकसारीक घडामोडी टिपण्यासाठी २४ तास सॅटेलाईट्स कार्यरत असतात. तरीही पणजी वेधशाळेला ‌एक दिवस आधी गोव्यातील पावसाचा अंदाज आला नाही. उलट पाऊस सुरू झाल्यानंतर ‘यलो अलर्ट’ जारी केला. याबद्दल सर्वसामान्य गोवेकरांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. अखेर इतकी मोठी यंत्रणा राबवूनही जर २४ तास आधी हवामानाचा अंदाज घेता येत नसेल तर, ही यंत्रणा काय कामाची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा