इन्व्हर्टरने घेतला लाईनमन मनोज जांबावलीकरचा बळी

वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नां​डिस यांची माहिती; जांबावलीकर कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर


20th April, 12:52 am
इन्व्हर्टरने घेतला लाईनमन मनोज जांबावलीकरचा बळी

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : व्हाळशी-डिचोली येथे वीज खांबावर दुरुस्ती कामासाठी गेलेल्या मनोज जांबावलीकर (३४, ​पिळगाव) या लाईनमनचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यावरून नागरिक व विरोधी पक्षांनी आरोपबाजी सुरू केली असतानाच, यात मनोज यांची चूक नाही. फिटनेस फॅक्टरी या आस्थापनाच्या इन्व्हर्टरमुळेच मनोजचा मृत्यू झाल्याची माहिती वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी दिली.              

दुरुस्ती कामासाठी वीज खांबावर चढलेल्या लाईनमन मनोज जांबावलीकर यांचा शुक्रवारी​ विजेच्या धक्क्याने खांबावरच दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे पडसाद डिचोलीसह राज्यात उमटले. स्थानिक व विरोधी पक्षांनीही यावरून वीज खात्याच्या कामाबाबत संताप व्यक्त केला. खात्याचे अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह न उचलण्याचा निर्धार स्थानिकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर अखेर तब्बल दोन तासांनी मनोज यांचा मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.            

मनोज जांबावलीकर दोन वर्षांपूर्वी नोकरीत रुजू झाले होते. त्यांना एका महिन्याची मुलगी आहे. त्यांच्या अकाली मृत्युमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी मनोज यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेबाबत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दुःख व्यक्त केले.

कामावेळी हातात ग्लोव्हज नव्हते!

लाईनमन मनोज जांबावलीकर वीज खांबावर चढले होते, त्यावेळी त्यांच्या हातात ग्लोव्हज नव्हते. त्यामुळे वीज खाते कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घेत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला. परंतु, या घटनेत मनोज यांची कोणतीही चूक नव्हती. फिटनेस फॅक्टरीच्या इन्व्हर्टरमुळेच जांबावलीकर यांचा मृत्यू झाल्याचा दावा मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी केला आहे.


मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस म्हणाले...            

मनोज जांबावलीकर यांनी दुरुस्तीकाम सुरू केले तेव्हा वीज खात्याचा ट्रान्स्फॉर्मर, आयझोवेटर बंद होता.             

त्या परिसरातील फिटनेस फॅक्टरी या आस्थापनातील इन्व्हर्टरची जोडणी व्यवस्थित नव्हती. त्या इन्व्हर्टरचा दाब खात्याच्या जोडणीवर आला होता. त्या इन्व्हर्टरच्या २२० व्होल्टचा धक्का मनोज यांना लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.             

जनरेटरसाठी ग्राहक वीज खात्याची परवानगी घेतात. खात्याकडूनही जनरेटरला परवानगी देण्यात येते; पण इन्व्हर्टरचा वापर करणारे अनेकजण खात्याची परवानगी घेत नाहीत. ज्याची जबाबदारी ग्राहकाची असते.

झालेल्या दुर्घटनेस लाईनमन मनोज जांबावलीकर जबाबदार नाहीत. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

हेही वाचा