निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांतून ३३ अर्ज सादर

आज छाननी; सोमवारी​ अर्ज मागे घेण्याचा दिवस


20th April, 12:27 am
निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांतून ३३ अर्ज सादर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून १६ आणि दक्षिण गोव्यातून १७, असे एकूण ३३ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर झाले आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास शुक्रवारपर्यंतची मुदत होती. अखेरच्या दिवसापर्यंत दोन्हीही मतदारसंघांतून एकूण ३३ अर्ज सादर झाले आहेत. काही उमेदवारांनी दोन, काहींनी तीन, तर भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी चार अर्ज सादर केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपतर्फे श्रीपाद नाईक व प्रेमेंद्र शेट, काँग्रेसकडून अॅड. रमाकांत खलप व अश्विन खलप, आरजीपीकडून मनोज परब, अखिल भारतीय परिवार पार्टीकडून सखाराम नाईक, बसपतर्फे मीलन वायंगणकर यांनी, तर शकील जमाल शेख, थॉमस फर्नांडिस आणि विशाल नाईक यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केले आहेत.
दक्षिण गोव्यातून भाजपतर्फे पल्लवी धेंपो व आमदार गणेश गावकर, काँग्रेसकडून कॅ. विरियातो फर्नांडिस व अनिता फर्नांडिस, आरजीपीकडून रुबर्ट परेरा, बसपतर्फे डॉ. श्वेता गावकर, तर दीपकुमार मापारी, हरिश्चंद्र नाईक, अॅलेक्सी फर्नांडिस आणि डॉ. कालिदास वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केले आहेत.
दरम्यान, शनिवारी अर्जांची छाननी होणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी २२ एप्रिलची मुदत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांसह किती अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, हे २२ एप्रिल रोजीच स्पष्ट होणार आहे.                        

हेही वाचा