युरी आलेमाव यांच्या टिप्पणीनंतर भंडारी समाज समिती आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 01:03 am
युरी आलेमाव यांच्या टिप्पणीनंतर भंडारी समाज समिती आक्रमक

पणजी : विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी आमदार जीत आरोलकर यांना अपशब्द वापरून संपूर्ण भंडारी समाजाचा अपमान केला आहे. यामुळे त्यांनी पुढील सात दिवसांत आरोलकर यांची बिनशर्त माफी मागावी. असे न झाल्यास त्यांना भंडारी समाजाकडून तीव्र विरोध स्वीकारावा लागेल, असा इशारा गोमंतक भंडारी समाज युवा समितीने दिला आहे.  मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे माजी अध्यक्ष दिक्षक नाईक अडपईकर यांनी सांगितले की, सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. अशावेळी राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. मात्र, एखाद्या नेत्याला अपशब्द वापरणे किंवा व्यक्तिगत टीका करणे चुकीचे आहे. त्यांनी आरोलकर यांना ‘लापीट’ हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ काहीही किंमत नसलेला माणूस असा होतो.            

आरोलकर यांचे गोव्यात आणि भंडारी समाजात मोठे स्थान आहे. अशा व्यक्तींसाठी ‘लापीट’ हा शब्द भंडारी समाज सहन करून घेणार नाही, असे आडपईकर म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांनी एनडीएचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे. संविधान धोक्यात असल्याची भाकड कथा सांगणाऱ्यांनाच लोकशाही मूल्यांचा आदर नाही. — डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री 

सदर प्रतिक्रिया देताना मी कुणाचेही नाव घेतले नव्हते. तरी देखील भंडारी समाजातील काही युवकांना माझे शब्द योग्य वाटत नाहीत आणि यामुळे ते त्यांच्या भावना दुखावल्याचा दावा करत असतील तर माफी मागण्यास माझी हरकत नाही. — युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते