वेळूस येथील निराधार महिलेचे घर कोसळले

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास बेघर होण्याची पाळी ‌

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 12:02 am
वेळूस येथील निराधार महिलेचे घर कोसळले

वेळूस येथील सत्यवती चारी यांच्या एका बाजूच्या घराचे कोसळलेले छप्पर.

वाळपई :
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळूस येथील सत्यवती चारी या निराधार महिलेचे घर कोसळल्यामुळे तिला बेघर होण्याची पाळी आली आहे‌. घराचे एका बाजूचे छप्पर पूर्णपणे कोसळले असून येत्या पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती हाती न घेतल्यास या महिलेला पूर्णपणे बेघर होण्याची पाळी येणार आहे. यामुळे दात्याकडून मदत करावी व आपल्याला घराचे छत्र उभारून द्यावे, अशी मागणी सत्यवती चारी यांनी केली आहे.
वेळूस येथे सत्यवती चारी या एकट्याच आपल्या घरात राहतात. राज्य सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत येणाऱ्या फक्त दोन हजार रुपयांच्या रकमेवर त्या आपला संसार चालवीत आहेत. त्या रहात असलेल्या घराची परिस्थिती पूर्णपणे बिकट झाली आहे. घराची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घराची दुरुस्ती करणे जमले नाही‌. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या घराच्या एका बाजूचे छप्पर पूर्णपणे कोसळले. त्यामुळे धोकादायक अवस्थेत त्या याच घरात वास्तव्य करीत आहेत. सत्यवती यांचे वय सुमारे ७०च्या आसपास असल्यामुळे आणि हातात पैसे नसल्यामुळे तिला या घराची दुरुस्ती करणे शक्य नाही. यामुळे समाजातील दातृत्वाकडून आपल्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा त्या करीत आहेत.
दरम्यान, घराचे छप्पर धोकादायक बनले असून छप्पराचा उर्वरित भाग कधीही कोसळू शकतो. तसे झाल्यास आपल्या जीवालाही धोका आहे, असे चारी यांनी यावेळी सांगितले. 


घर दुरुस्तीसाठी मदतीचा हात; तरीही उपेक्षाच !
पावसाळ्यापूर्वी या घराची दुरुस्ती न झाल्यास सत्यवती चारी यांच्यावर बेघर होण्याची पाळी येऊ शकते. सध्या त्या निराधार असून अन्य कुणीही कुटुंबातील सदस्य नसल्यामुळे तिला संघर्षपूर्ण जीवन जगावे लागत आहे. या संदर्भात सत्यवती चारी यांच्याशी संपर्क साधून तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून आपल्या घराची दुरुस्ती व्हावी यासाठी आपण अनेकांकडे हात पसरले. मात्र, कोणाकडूनही मदत मिळाली नाही.