चोरांच्या मुसक्या आवळा

शिक्षाच होत नसल्यामुळे बहुतेक जण पुन्हा पुन्हा चोरी करत असतात. काही प्रकरणांत चोरांच्या टोळ्या एका राज्यात चोऱ्या केल्यानंतर काही दिवस दुसऱ्या राज्यात जाऊन चोऱ्या करतात, असेही पोलिसांना यापूर्वी तपासात आढळून आले आहे. त्यासाठीच जेव्हा हे चोर सापडतात, तेव्हा त्यांच्या विरोधात पुराव्यांसह प्रबळ खटले दाखल करण्याची गरज आहे.

Story: संपादकीय |
17th April, 12:55 am
चोरांच्या मुसक्या आवळा

दक्षिण गोव्यात विशेषतः सासष्टीत चोरीचे प्रकार नवे नाहीत. रेल्वेची ये - जा सुरू असते त्यामुळे परराज्यांतून गोव्यात येणारे चोरटे रेल्वेने रात्रीत पसारही होतात, असे काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या निदर्शनास आले होते. आजही तीच स्थिती नाही असे म्हणता येणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये सासष्टीत बंद घरे फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. बेताळभाटी येथे भरदिवसा चोरट्यांनी एक बंद घर फोडण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे तर खळबळ उडाली आहे. लोकवस्तीत भरदिवसा हे चोर येऊन दार फोडण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या लोखंडी सळ्यांचा वापर करून दोन चोरटे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना घराचा केअरटेकर आल्याचे लक्षात आल्यामुळे ते पसार झाले. यावेळी तावडीत कोणी सापडला तर हातातील शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला करण्यासही हे चोर मागे पुढे पाहणार नाहीत. तीन आठवड्यांपूर्वी नावेली येथे अमेरिकेत राहणाऱ्या गोव्यातील यूट्यूबर कुटुंबाचे घर फोडून सुमारे ६९ लाखांचे दागिने व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये दिकरपाली येथे एक घरफोडीचा प्रकार घडला होता. दोन दिवसांपूर्वी बेताळभाटी येथे घर फोडण्याचा केलेला प्रयत्न फसला असला तरी चोरांनी बाळ्ळी येथील एका घरात चोरी करून सुमारे ४.३२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळसूत्र, गळ्यातील सोनसाखळ्या चोरण्याचे प्रकारही सासष्टीत वारंवार घडत आहेत. एकेकाळी रात्रीच्या वेळी घरफोडी करून रेल्वेने गोव्याबाहेर पसार होणारे चोर आजही मडगाव जवळील भागात चोऱ्या करून पसार होत असावेत. आके आणि दवर्ली या भागात फेब्रुवारीत मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या हिसकावून पळवण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. या चोऱ्यांचे भयानक रूप बेताळभाटी येथे भरदिवसा घरफोडी करण्याच्या प्रयत्नामुळे समोर आले. वेर्णेकर यांच्या घरातूनही याच चोरांनी दागिने लंपास केल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे एकाच टोळीचे वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय असलेले सदस्य असू शकतात. 

चोरट्यांचा योग्यवेळी बंदोबस्त केला नाही तर काय होऊ शकते, त्याचा अनुभव यापूर्वीही गोवेकरांनी घेतला आहे. मडगाव शहरात २०२० साली दरोडा फसल्यानंतर सराफ स्वप्नील वाळके याची दरोडेखोरांनी हत्या केली होती. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. २०२२ मध्ये करमणे - दाबाळ येथील रुपा पारकर यांचा खूनही चोरी करण्यासाठी आलेल्यानेच केला होता. त्यामुळे चोरीच्या प्रकारांना रोखण्यासाठी पोलिसांनी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. हल्लीच उत्तर गोव्यात नरोत्तम सिंग धिल्लन यांच्या खुनातही चोरीचा हेतू असलेल्यांचाच हात होता. गोव्यातील गुन्हेगारीच्या क्षेत्रात चोरांच्या टोळ्या पूर्वीपासून सक्रिय आहेत. अनेक वर्षांपूर्वी घरफोडीसारख्या घटनांमध्ये सहभाग घेणाऱ्या चोरांच्या टोळ्यांचे नंतर गुंडांच्या टोळ्यांमध्ये रूपांतर झाल्याचेही गोव्याने पाहिले आहे. त्यामुळे चोऱ्या, दरोडे यांच्यापासून लोकांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी उपाय आखणे गरजेचे आहे.

गोव्यात विशेषतः सासष्टी, केपे, मुरगाव, बार्देश, तिसवाडी भागांत हजारो घरे बंद आहेत. नोकरीनिमित्त स्थायिक झालेले किंवा विदेशात स्थलांतरित झालेले, पण कधीतरी गोव्यात येणाऱ्या गोमंतकियांची घरे बंद असतात. त्यामुळे अशा घरांमध्ये चोऱ्या करण्यासाठी चोरांच्या टोळ्या सक्रिय असतात. चोरीपूर्वी कुठल्या तरी कामानिमित्त त्या परिसरात येऊन पाहणी करायची आणि दरोड्यासाठी योग्य घर शोधून ठेवायचे. पुढे संधी मिळेल तेव्हा कधीतरी दरोडा टाकायचा, चोरी करायची असे चोरांचे नियोजन असते. अनेक चोरीच्या घटनांमध्ये चोरीपूर्वी पाहणी केल्याचे चोरांकडून कबूल केले जाते. चोरीच्या प्रकरणांत अटक केलेल्यांचे खटलेही पोलिसांकडून फार गांभीर्याने मांडले जात नाहीत. त्यामुळे पकडलेल्या चोरांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे एकच चोर राज्यातील अनेक चोऱ्यांमध्ये सहभाग  घेतो. यापूर्वी गोव्यातील पोलिसांनी पकडलेल्या अनेक चोरांचा राज्यातील एकापेक्षा जास्त चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. चोरीच्या प्रकरणात आरोपी पकडले की त्यांना शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. न्यायालयीन खटले गांभीर्याने लढायला हवेत. शिक्षाच होत नसल्यामुळे बहुतेक जण पुन्हा पुन्हा चोरी करत असतात. काही प्रकरणांत चोरांच्या टोळ्या एका राज्यात चोऱ्या केल्यानंतर काही दिवस दुसऱ्या राज्यात जाऊन चोऱ्या करतात, असेही पोलिसांना यापूर्वी तपासात आढळून आले आहे. त्यासाठीच जेव्हा हे चोर सापडतात, तेव्हा त्यांच्या विरोधात पुराव्यांसह प्रबळ खटले दाखल करण्याची गरज आहे.