बांबोळीतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

मिलिटरी कॅम्पजवळ पर्यटक टॅक्सीने दिली धडक


17th April, 12:51 am
बांबोळीतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यातील अपघातांचे सत्र कायम आहे. मंगळवारी दुपारी बांबोळी येथील मिलिटरी कॅम्पजवळ पर्यटक टॅक्सी कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारा रोहन खेडेकर (२५, रा. ठाणे-मुंबई) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन खेडेकर हा मोटारसायकल घेऊन बांबोळीहून आगशीला जात होता. एका नागरी सेवेतील अधिकाऱ्याच्या मुलाला उच्च माध्यमिक शाळेतून घेऊन पर्यटक टॅक्सी त्याच दिशेने जात होती. बांबोळी येथील मिलिटरी कॅम्पजवळ अंडरपास जवळ पोहोचताच रोहन याने इतर वाहनांना ओव्हरटेक करून, तसेच स्पीड ब्रेकर जवळ वेग कमी न करता पर्यटक टॅक्सीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी टॅक्सी उजव्या बाजूला वळाली. दोन्ही वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रोहन मोटरसायकलवरून दूरवर फेकला गेला. बाजूला असलेल्या दगडावर तो आपटला. घरी मडगावाला जाणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने इतर नागरिकांच्या मदतीने आपल्या गाडीतून त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती आगशी पोलीस परिसरातील नियंत्रण कक्षाच्या वाहनाला मिळाली. त्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल कुट्टीकर यांनी पंचनामा केला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून १६ दिवसांत राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत २० जणांनी जीव गमावला आहे. २०२४ या वर्षात गेल्या साडेतीन महिन्यांत सुमारे १०० जणांचा अपघातांत बळी गेला आहे. मोठ्या प्रमाणात जागृती, तसेच प्रसंगी कायदाभंग करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करूनही दररोज कुठे ना कुठे अपघात होतच आहेत.