धर्मनिरपेक्ष, संविधानाची मूल्ये जपणाऱ्या उमेदवारांना मत द्या !

कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांचे आवाहन


17th April, 12:35 am
धर्मनिरपेक्ष, संविधानाची मूल्ये जपणाऱ्या उमेदवारांना मत द्या !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील ख्रिस्ती बांधवांनी धर्मनिरपेक्ष, लोकांचे भले होण्यासाठी काम करणाऱ्या, तसेच संविधानाची मूल्ये जपणाऱ्या उमेदवाराला मत द्यावे, असे आवाहन कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी केले आहे. मतदान करणे हा केवळ हक्क नसून ते देशाप्रतीचे एक कर्त्यव्य आहे, हे लक्षात घेऊन पात्र मतदारांनी ७ मे रोजी मतदान करावे, असेही कार्डिनल फेर्राव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात फेर्राव म्हणतात की, लोकशाहीमध्ये राजकीय जीवनातील निवडी करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर असते, असे मानले जाते. कॅथलिक परंपरेत जबाबदार नागरिकत्व हा एक सद्गुण समजला जातो. तसेच राजकीय कार्यात सहभाग घेणे हेदेखील बंधनकारक कर्तव्य आहे. तुमचे मत हे आपल्या देशाच्या भल्यासाठी केलेले वैयक्तिक योगदान आहे. काही लोक कुटुंब आणि मित्रांसह सुट्टीच्या दिवशी किंवा अगदी निवडणुकीच्या दिवशी तीर्थयात्रेला जातात. मात्र मतदान प्रक्रियेत सहभागी न होणे हे राष्ट्रासाठी घातक ठरू शकते. असे नागरिक त्यांच्या वैयक्तिक नागरी जबाबदारीत अपयशी ठरतील.
गोव्याहून वालंकिणी येथे दर सोमवारी नियमित ट्रेन असते. मी सर्वांना आवाहन करतो की, सोमवार ६ मे २०२४ रोजी त्या ट्रेनचा प्रवास टाळावा आणि त्याऐवजी इतर कोणत्याही सोमवारी बुकिंग करावे. बुकिंग आधीच केले असेल तरी मताधिकाराचा वापर करण्याच्या चांगल्या आणि पवित्र कर्तव्यासाठी ते रद्द करणे नक्कीच फायदेशीर आहे.
३, ५ मे रोजी विशेष प्रार्थनासभा घ्या !
एखाद्या राष्ट्राचा विकास हा तेथील नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आणि जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो. राष्ट्र उभारणीत आणि समाजाचे नैतिक चारित्र्य घडवण्यात चर्च कटिबद्ध आहे. यासाठी मी निवडणुकांसाठी विशेष संघटित प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. मी राज्यातील पॅरिश प्रिस्ट, धर्मगुरू आणि गोव्यातील धार्मिक गृहांच्या वरिष्ठांना विनंती करतो की, निवडणुकांच्या खऱ्या यशासाठी ३ मे आणि/किंवा ५ मे रोजी विशेष प्रार्थनासभा आयोजित करावी, असे आवाहन फेर्राव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.